कुंभमेळ्यापूर्वी अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी सोडवा; अंबादास दानवेंचे गडकरींना पत्र

कुंभमेळ्यापूर्वी अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी सोडवा; अंबादास दानवेंचे गडकरींना पत्र
कुंभमेळ्यापूर्वी अजिंठा घाटातील वाहतूक कोंडी सोडवा; अंबादास दानवेंचे गडकरींना पत्र

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ७ :- छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात वारंवार निर्माण होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीच्या समस्येकडे शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

अजिंठा लेणींकडे जाणाऱ्या सुमारे ४.५ किलोमीटर घाट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. केवळ एप्रिल महिन्यात तब्बल ३८ वेळा चक्काजाम झाल्याने पर्यटक, वाहनचालक आणि स्थानिक प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे.

वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे रेल्वे व विमान प्रवासाचे नियोजन विस्कळीत होत असून, अनेक टूर ऑपरेटर्स अजिंठा लेणी सहलीतून वगळण्याचा विचार करत असल्याची गंभीर बाबही त्यांनी मांडली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासनावर मोठा ताण येत असून, एकदा वाहतूक ठप्प झाल्यानंतर ती पूर्ववत करण्यासाठी किमान ९० मिनिटे लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घाटात नादुरुस्त होणाऱ्या ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग किंवा ‘ले-बाय’ सुविधा नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव वनविभागाकडे प्रलंबित असल्याने समस्या अधिकच बिकट झाल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणून दिले.

पुढील काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत अजिंठा घाटातील वाहतूक समस्या कायम राहिल्यास भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घालून वनविभागाशी समन्वय साधावा, रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने मार्गी लावावे, घाटात कायमस्वरूपी क्रेनची व्यवस्था करावी तसेच नादुरुस्त वाहनांसाठी स्वतंत्र ‘ले-बाय’ उभारावेत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

“अजिंठा घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला नाही, तर पर्यटन आणि भाविकांच्या सुरक्षेवर मोठा परिणाम होऊ शकतो,” अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे.