कर्णकर्कश बुलेटस्वारांवर ग्रामीण पोलिसांचा ‘रोडरोलर अ‍ॅक्शन’- ३२ मॉडिफाईड सायलेन्सर चिरडून नष्ट

कर्णकर्कश बुलेटस्वारांवर ग्रामीण पोलिसांचा ‘रोडरोलर अ‍ॅक्शन’- ३२ मॉडिफाईड सायलेन्सर चिरडून नष्ट
कर्णकर्कश बुलेटस्वारांवर ग्रामीण पोलिसांचा ‘रोडरोलर अ‍ॅक्शन’- ३२ मॉडिफाईड सायलेन्सर चिरडून नष्ट

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :-

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकींमुळे सर्वसामान्य नागरिक, रुग्ण, वृद्ध, महिला व लहान मुलांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाईची मोहीम राबविली आहे.

मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण यांच्या आदेशानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सायलेन्सर मॉडिफाय केलेल्या बुलेट वाहनांविरोधात जिल्हाभर विशेष मोहीम हाती घेण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांमध्ये वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी व्यापक तपासणी केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई करण्यात आली.

या संयुक्त कारवाईत एकूण ३२ बुलेट दुचाकींवरील मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून सायलेन्सर तात्काळ काढून घेण्यात आले.

कर्णकर्कश आवाजामुळे रुग्णालय परिसर, शाळा, वसाहती, बाजारपेठा व मुख्य चौकांमध्ये नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर दि. 02/02/2026 रोजी पोलीस मुख्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे जप्त सायलेन्सर रोडरोलरने चिरडून नष्ट करण्यात आले. हा उपक्रम समाजाला कडक व स्पष्ट संदेश देणारा असून, यापुढेही अशा बेकायदेशीर बदलांवर शून्य सहनशीलतेची भूमिका राहील, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्पष्ट केले.

“वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करून कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांमुळे समाजातील शांतता भंग होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही मोहीम असून भविष्यातही अशी कारवाई नियमितपणे सुरू राहील,” असेही त्यांनी सांगितले.

ग्रामीण पोलीस दलाने सर्व वाहनचालकांना आवाहन केले आहे की, वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनांमध्ये अनधिकृत बदल करू नयेत आणि नागरिकांच्या शांततेचा आदर करावा. नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.