"एकाच भागात का अतिक्रमण हटाव?"महापालिकेच्या भूमिकेवर खासदार डॉ. कल्याण काळेंचा सवाल
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ जून:- संजयनगर व मुकुंदवाडी परिसरातील अतिक्रमण हटाव कारवाईनंतर संतप्त आणि अस्वस्थ झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी प्रत्यक्ष दौरा केला. त्यांनी अतिक्रमित भागाची पाहणी करत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला.
डॉ. काळे यांनी स्पष्टपणे नमूद केले की, 60 मीटरचा विकास आराखडा (DP) तयार केला गेलेला असून त्यानुसार अतिक्रमण हटवणे अपेक्षित होते, ही बाब मान्य आहे. मात्र, आराखाड्याबाहेरील घरेही तोडण्यात आली असल्याचे त्यांच्या पाहणीत आढळले, जी अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी यावर सवाल उपस्थित केला की, कारवाई संपूर्ण शहरभर एकसमान का राबवली जात नाही? विशेषतः मुकुंदवाडी आणि संजयनगर परिसरातीलच निवडक अतिक्रमणे हटवली गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
याप्रसंगी त्यांनी हेही अधोरेखित केले की, महापालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा नोटीस न देता ही कारवाई केली, त्यामुळे ही कारवाई दबावाखाली झाली की काय, असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे.
"महापालिकेने कारवाई करताना पारदर्शक आणि एकसमान धोरण राबवावे. जे नागरिक अन्यायग्रस्त झाले आहेत, त्यांना त्वरित मदत मिळावी," अशी ठाम मागणी खासदार डॉ. काळे यांनी केली.