उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.!संपर्क समन्वय योजना तयार करुन आपत्ती निवारणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश
मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि २७ :- आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेत असतांना सद्यस्थितीत येऊ घातलेल्या उष्णतेच्या लाटेचा प्रतिकार कसा करावा, याबाबत यंत्रणांनी जनजागृती करावी. आरोग्य विभागाने सर्वस्तरावरील आरोग्य संस्थांमध्ये शीत कक्ष उभारुन सज्जता ठेवावी,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली. तसेच संपर्क व समन्वयाची योजना तयार ठेवून संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी सर्व विभागांनी सज्ज रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी आज सर्व यंत्रणांना दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक पार पडली. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अति. पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा संगिता राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के तसेच सर्व संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात गोदावरी नदी काठावर निळ्या रेषेखाली येणारी पैठण तालुक्यात १८ तर वैजापूर तालुक्यात १७ व गंगापूर तालुक्यात ८ अशी एकूण ४३ गावे आहेत. पैठण तालुक्यात पैठण शहर, कावसान, दादेगाव- जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव व वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूरढोक, बाभूळगाव, बाजाठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो. तर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १६, पैठण तालुक्यात १५, फुलंब्री तालुक्यात ७, वैजापूर तालुक्यात ३१, गंगापूर तालुक्यात २६, खुलताबाद तालुक्यात ६, सिल्लोड तालुक्यात १०, कन्नड तालुक्यात ४८ तर सोयगाव तालुक्यात ६ अशी एकूण १६५ गावे ही पूरप्रवण आहेत. जिल्ह्यात कायगाव ता. गंगापूर येथे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्ता व पैठण येथून शेवगाव कडे जाणारा रस्ता असे गोदावरी नदीवरील पुल पुराने बाधीत होतात. तसेच जिल्ह्यात एकूण ६३ लहान मोठे पूल आहेत. त्या पुलांची तपासणी करावी. पुरामुळे वा अन्य काही कारणामुळे पुलावरुन वाहतुक होणे शक्य नसल्यास पर्यायी वाहतुक मार्ग आत्ताच शोधून ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.
आपत्तीच्या प्रसंगी बचाव कार्यात मदत करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे ५ बोटी, १९५ लाईफ जॅकेट्स, १६० लाईफ बॉय, २१५ बचाव साहित्य किट, ८१५ फोल्डींगचे स्ट्रेचर,८१५ बॉडी कव्हर बॅग्ज, १३२ सेफी हेल्मेट्स, १० रेस्क्यू क्राफ्ट्स, आपात्कालिन प्रकाश योजनेचे १७ संच, २७६ गम बुट जोडे, तात्पुरते उभारावयाचे २० तंबू, ५ दुर्बिणी असे साहित्य असून जिल्ह्यात ७९ ठिकाणी वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील २८ जणांनी स्कूबा डायव्हिंग तर २०९ जणांना आपदा मित्र म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात १२ निवारा केंद्र आहेत.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, पुराचा धोका संभावणारी गावे, किंवा पुराच्या पाण्याने वेढली जाणारी गावांमध्ये जलशुद्धीकरणाची औषधी, साथरोगाची औषधे, अत्यावश्यक अन्नधान्य साठा इ. ची व्यवस्था करुन ठेवावी. तसेच जिल्ह्यातील पुलांचे, धरणांच्या बंधाऱ्यांची, लहान मोठ्या तलावांची माहिती अद्यावत करावी व देखभाल दुरुस्ती करुन घ्यावी. जिल्ह्याची सर्व विभागांची संपर्क व समन्वय व्यवस्था तयार करावी. प्रत्येक विभागाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा येत्या १५ मे पर्यंत पुर्ण करावा. प्रत्येक विभागाचा २४x७ नियंत्रण कक्ष तयार करुन कार्यान्वित करावा. सर्व ग्रामपातळीवरील अधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयी थांबावे,असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.