उर्दू शाळेत मराठीचा जागर; कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ‘माझी मराठी’ पुस्तकांचे वाटप

उर्दू शाळेत मराठीचा जागर; कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ‘माझी मराठी’ पुस्तकांचे वाटप
उर्दू शाळेत मराठीचा जागर; कुसुमाग्रज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना ‘माझी मराठी’ पुस्तकांचे वाटप

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २७ :-

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ मिसरवाडी येथील कुसुमाग्रज मोहल्ला बालवाचनालय, मिलेनियम इंग्लिश स्कूल आणि रशिदा बेगम देशमुख उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरा करण्यात आला. “उर्दूच्या अंगणात मराठीचे बोल” या संकल्पनेतून भाषिक ऐक्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विशेष साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कलीम अहमद कादरी लिखित ‘माझी मराठी’ हे पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच पत्रलेखनाची सवय वाढावी यासाठी पोस्ट कार्डचे वाटप करण्यात आले. याशिवाय बालभारतीकडून प्रकाशित होणारे मुलांचे लोकप्रिय ‘किशोर’ मासिकही विद्यार्थ्यांना वाचनासाठी देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकता एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीचे संस्थापक अब्दुल मुकीम देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून वाचन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व ‘रीड अँड लीड फाउंडेशन’चे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम बेग आणि सोसायटीचे सचिव अमान देशमुख उपस्थित होते.

अब्दुल मुकीम देशमुख यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेत त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तर मिर्झा अब्दुल कय्युम यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर आणि तिचे महत्त्व पटवून दिले.

‘रीड अँड लीड फाउंडेशन’च्या मरयम मिर्झा बालवाचनालय अभियानांतर्गत सुरू असलेल्या या मोहल्ला वाचनालयामुळे परिसरातील मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढताना दिसत आहे. यावेळी उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी मराठी कविता व गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचा समारोप सामूहिक ‘महाराष्ट्र गीत’ गायनाने झाला.

या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाषेच्या भिंती ओलांडून ज्ञानाचा प्रवास घडवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक आणि मनात साहित्याची आवड निर्माण करणारा ठरला.