मुंबईच्या सहयोग ट्रस्ट व निर्मिक लर्निंग सेंटरकडून ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मोहल्ला बाल वाचनालया’ला भेट; उपक्रमाचे कौतुक
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- मुंबईस्थित सहयोग ट्रस्ट आणि निर्मिक लर्निंग सेंटर, देवगाव रंगारी यांच्या प्रतिनिधी मंडळाने नुकतीच बायजीपुरा परिसराला भेट देत ‘मरयम मिर्झा मोहल्ला बाल वाचनालय अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मोहल्ला बाल वाचनालया’ची पाहणी केली. यावेळी वाचनालयातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती घेत या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
भेटीदरम्यान रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यांनी शहरातील विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून राबविण्यात येणाऱ्या प्रेरणादायी उपक्रमांची माहिती देत बालवाचनालयासाठी पुस्तकांची भेट दिली.
या दौऱ्यात सहयोग ट्रस्टच्या सीनियर प्रोग्राम असिस्टंट आसिया शेख, सीनियर प्रोग्राम असिस्टंट (अकाउंट्स अँड कम्युनिकेशन) जाबीब खान, तसेच निर्मिक लर्निंग सेंटरचे अतुल गवळी आणि गोविंद मोरे उपस्थित होते. अतुल गवळी यांनी वाचनालयाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेत उपक्रमाची पाहणी केली.
यावेळी रीड अँड लीड फाउंडेशनच्या सचिव सायरा परवीन यांच्यासोबत शहरातील महिलांचे सामाजिक जीवन, आरोग्यविषयक प्रश्न आणि जनजागृती उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. तसेच ‘मरयम मिर्झा मोहल्ला बाल वाचनालय अभियान’च्या जनक मरयम मिर्झा यांनी अभियानाची सुरुवात, त्याचा प्रवास, मिळालेले यश आणि समोर आलेल्या आव्हानांविषयी माहिती दिली.
भेटीदरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी या अभिनव उपक्रमाचे मुक्तकंठाने कौतुक केले. विविध संस्थांचे अनुभव एकमेकांशी सामायिक करून भविष्यात शिक्षण आणि समाजकल्याण क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याच्या संधींचा शोध घेणे हा या भेटीमागील मुख्य उद्देश होता. हा दौरा भविष्यात अधिक सक्षम सहकार्याचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
— वाचन संस्कृतीची बीजे रुजविणाऱ्या अशा उपक्रमांमुळे समाजातील नव्या पिढीला ज्ञानाची नवी दिशा मिळत आहे.