इम्तियाज जलील यांना परवेज सिद्दिकी यांचा सणसणीत प्रत्युत्तर : "ते कलाकार, आम्ही कार्यकर्ते!"

इम्तियाज जलील यांना परवेज सिद्दिकी यांचा सणसणीत प्रत्युत्तर : "ते कलाकार, आम्ही कार्यकर्ते!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५जून :– समाजवादी पक्षाचे प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दिकी यांनी दि ४ रोजी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आसिम आझमी यांच्यावर जलील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सिद्दिकी म्हणाले, "इम्तियाज जलील यांची राजकारणातील उंची इतकी नाही की ते आझमी यांच्यासारख्या नेत्यावर वक्तव्य करू शकतील. ते एक नाचणारे कलाकार आहेत. त्यामुळे आझमींनी त्यांना उत्तर देण्याचे योग्यही समजले नाही."

सिद्दिकी पुढे म्हणाले की, "इम्तियाज जलील यांनी ‘दलाल’ असा शब्द वापरून स्वतःचं राजकीय आणि वैयक्तिक स्तर किती खालच्या दर्जाचं आहे, हे दाखवून दिलं आहे. एकेकाळी ज्यांनी त्यांच्या निवडणुकीत रिक्षा विकून प्रचार केला, त्यांना आजपर्यंत घर मिळालं की नाही माहीत नाही. मात्र, जलील यांनी स्वतःसाठी ‘मन्नत’ नावाचा आलिशान बंगला उभारला."

यावेळी सिद्दिकी यांनी भाजप आणि एमआयएम यांच्यावरही घणाघाती टीका केली. "भाजपचा आयटी सेलच एमआयएमचा आयटी सेल चालवतो. हे पक्ष देशात अस्थिरता आणि विभाजन घडवण्याचे काम करत आहेत, तर समाजवादी पक्ष सर्व समाजाला एकत्र ठेवण्याचे कार्य करतो," असे ते म्हणाले.

मुंबईतील अलीकडील आंदोलनात अबु आजमी यांच्यावर इम्तियाज जलील यांनी टीका केली होती. त्यास उत्तर देताना सिद्दिकी म्हणाले, "या टीकेवरून जलील यांच्या नेतृत्वाची पातळी स्पष्ट होते."

येत्या महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष सर्व समाजातील प्रतिनिधींना संधी देत निवडणुका लढवणार आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शहरात कोअर कमिटीची बैठक घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.

या पत्रकार परिषदेला प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ, अकील शेख, रियाजोद्दीन देशमुख, आयुब खान, अयुब पटेल आणि शेख अब्दुल रफिक आदी मान्यवर उपस्थित होते.