अन्यायकारक प्रभागरचनेविरोधात अझर पठाण यांची लेखी हरकत

अन्यायकारक प्रभागरचनेविरोधात अझर पठाण यांची लेखी हरकत

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी जाहीर झालेल्या प्रभागरचनेवरून शहरात नवा वाद पेटला आहे. आज, ४ सप्टेंबर रोजी अॅड. अझर पठाण यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी हरकती दाखल करत थेट प्रश्न उपस्थित केला – "लोकसंख्येतील एवढी तफावत ठेवून ही प्रभागरचना कोणाच्या फायद्यासाठी?"

शहरातील ११५ वॉर्डांचे २९ प्रभाग करण्यात आले आहेत. सरासरी ४२ हजार लोकसंख्या असायला हवी असताना प्रभाग २९ मध्ये लोकसंख्या ११ हजारांनी कमी, तर प्रभाग २२, २७ आणि २८ मध्ये तब्बल चार-पाच हजारांनी जास्त आहे. म्हणजे कुठे मतदार कमी, कुठे जास्त! मग निवडणूक समता कुठे राहिली?

पठाण यांनी यावर जोरदार आक्षेप घेत म्हणाले, "मतदारांच्या प्रतिनिधित्वात हा उघड अन्याय आहे. जुन्या वॉर्डांचे मतदान केंद्रे तोडून नवे प्रभाग तयार केले गेलेत. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होणार हे निश्चित."

त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, सामाजिक-आर्थिक व धार्मिक संतुलन न जपल्यास निवडणुकीत लोकशाहीचं नुकसान होईल. त्यामुळे प्रभागरचना पारदर्शक व न्याय्य व्हावी, यासाठी फेरविचार करण्याची मागणी त्यांनी केली.

📊 ठळक आकडेवारी सांगते खरी गोष्ट:

सरासरी लोकसंख्या : ४२,३४५

प्रभाग २९ : फक्त २९,१४९ (-११,१९६)

प्रभाग २२ : तब्बल ४६,६७६ (+४,३३१)

प्रभाग २७ : ४६,५८० (+४,२३५)

प्रभाग २८ : ४६,४२० (+४,०७५)

👉 थोडक्यात, कुठे मतदार गायब तर कुठे मतदारांचा स्फोट!

आता शहरात एकच चर्चा रंगली आहे – ही प्रभागरचना निवडणुकीच्या रंगतिला धक्का देणार का?

"जनतेच्या मतांचे वजन कमी-जास्त करणारी ही प्रभागरचना, खरंच लोकशाहीला न्याय देईल का?"