SIR कामात दिरंगाई; 137 बीएलओंना नोटीस, प्रशासन अलर्ट मोडवर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. १७ :- जिल्ह्यात मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जोरदार तयारी सुरू असून, कामात दिरंगाई केल्यामुळे तब्बल 137 बीएलओंना नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी १७ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. SIR प्रक्रिया लागू होण्याआधीच प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, सोमवारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात एकूण 3264 मतदान केंद्र असून, प्रत्येक केंद्रासाठी एक बीएलओ नियुक्त करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक 10 बीएलओंमागे एक पर्यवेक्षक नेमण्यात आला आहे. या मोठ्या मोहिमेसाठी सुमारे 4 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रक्रियेत राजकीय पक्षांनाही बीएलए (Booth Level Agent) नियुक्त करण्याची मुभा देण्यात आली आहे, जे प्रशासनाच्या बीएलओंना सहकार्य करतील.
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी ही SIR प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 2002 नंतर तब्बल 24 वर्षांनी ही मोहीम राबवली जात असून, दुबार नावे, स्थलांतरित, मयत तसेच अपात्र नागरिकांची नावे वगळण्यावर भर दिला जाणार आहे.
एप्रिल 2026 पासून या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रत्येक मतदाराला युनिक कोड असलेले फॉर्म दिले जातील. बीएलओ घरोघरी जाऊन हे फॉर्म वितरित करतील आणि भरलेली माहिती ऑनलाईन नोंदवली जाईल. त्यानंतर तपासणी, मॅपिंग आणि आक्षेप प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.
👉 मतदार यादी शुद्धीकरणासाठी प्रशासन सज्ज; मात्र कामचुकारांवर कारवाईची तलवार—निवडणूक प्रक्रियेला नवा वेग!