"20 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होणार; निवडणूक तयारीला वेग! क्षेत्रीय अधिकारी व विविध पथकांची नियुक्ती"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १८ :- महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली असून, त्यानुसार आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.
आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच निवडणूक प्रक्रिया सुसूत्र, पारदर्शक व शांततेत पार पडावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रत्येकी निवडणूक निर्णय अधिकारी निहाय एकूण 9 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एकूण 15 स्थिर सर्वेक्षण पथक, 28 व्हिडिओ सर्वेक्षण पथक, 9 व्हिडिओ चित्रीकरण तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
याशिवाय प्रत्येकी निवडणूक निर्णय अधिकारी निहाय एकूण 17 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत आदेश पुढील दोन दिवसांत निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक निर्भीड, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून, सर्व संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत, असेही निवडणूक विभागातर्फे सांगण्यात आले आहे.