“३० कोटींचा बंगला घोटाळा! मी गेल्यावर्षीच सांगितलं होतं” – आमदार रोहीत पवारांचा सरकारवर घणाघात
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ३ :- “केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ३० कोटी रुपये उडवले गेलेत! हा प्रकार मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता, आणि आता दक्षता व गुणनियंत्रक मंडळाच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे,” असं म्हणत आमदार रोहीत पवार यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
पवार म्हणाले, “मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची उधळपट्टी कशी केली गेली याची विस्तृत चिरफाड या अहवालात करण्यात आली आहे. एका बाजूला सरकारकडे निधी नाही, आणि दुसऱ्या बाजूला भिंतींना ग्रेनाइट कंपाऊंड बसवले गेलेत! एवढंच नव्हे, तर या दुरुस्ती कामांसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणं आवश्यक असतानाही ती घेतलेली नाही, हेही या अहवालातून उघड झालं आहे.”
ते पुढे म्हणाले, “गतवर्षी मी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. तेव्हा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उभं राहून मोठ्या तावातावाने ‘हे आरोप खोटे आहेत’ असं सांगितलं होतं. आता चौकशी अहवालानं घोटाळाच सिद्ध केला आहे — मग गुलाबराव पाटील आता यावर स्पष्टीकरण देतील का?”
रोहीत पवारांनी सरकारला थेट इशारा देत म्हटलं, “या प्रकरणात दोषी कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई न झाल्यास आगामी हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही.”
शेवटी पवारांनी स्पष्ट केलं, “मी पुराव्याशिवाय बोलत नाही. या सगळ्या गैरव्यवहाराची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. जनतेच्या पैशांचा असा वापर होणं म्हणजे प्रशासन आणि मंत्र्यांच्या बेजबाबदारपणाचं उदाहरण आहे.”
🔹 हा घोटाळा उघड झाल्यानंतर मंत्रालयातील दुरुस्ती व बांधकाम विभागातील कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नागरिकांकडून आता या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
🗞️ – महाराष्ट्र वाणी
"सत्ता खर्च करते, जनता विचारते!"