१० दिवसांत आंतरजिल्हा शस्त्र तस्करांच्या साखळीचा पर्दाफाश; ८ गावठी कट्टे, १४ काडतुसे जप्त, १० आरोपी जेरबंद

१० दिवसांत आंतरजिल्हा शस्त्र तस्करांच्या साखळीचा पर्दाफाश; ८ गावठी कट्टे, १४ काडतुसे जप्त, १० आरोपी जेरबंद
१० दिवसांत आंतरजिल्हा शस्त्र तस्करांच्या साखळीचा पर्दाफाश; ८ गावठी कट्टे, १४ काडतुसे जप्त, १० आरोपी जेरबंद

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) कि २७ :- ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणारे आणि त्यांची तस्करी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीविरोधात मोठी कारवाई करत केवळ १० दिवसांत शस्त्र तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश केला आहे. या मोहिमेत पोलिसांनी ८ गावठी कट्टे, १४ जिवंत काडतुसे जप्त करत १० आरोपींना अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या अंतर्गत १३ जून ते २२ जून या कालावधीत विविध ठिकाणी सापळे रचून ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखा आणि बिडकीन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गावठी कट्टे बाळगणाऱ्यांपासून थेट पुरवठादारांपर्यंत पोहोचत संपूर्ण साखळी उघडकीस आणली. विशेष म्हणजे या तपासात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याबाहेरील पुरवठादारांचाही सहभाग समोर आला.

गंगापूर, बिडकीन, अजिंठा आणि पैठण परिसरात केलेल्या कारवायांमध्ये आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. सर्व आरोपींविरोधात भारतीय हत्यार कायदा १९५९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे भविष्यात घडू शकणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, जिल्ह्यात अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री करणारे तसेच दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार आहे.

 वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक मोठ्या घडामोडीचा विश्वासार्ह आवाज!