सोलार प्रकल्पातील केबल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलार प्रकल्पातील केबल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलार प्रकल्पातील केबल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- सोलार ऊर्जा प्रकल्पांवरील केबल वायर चोरी करून अनेक जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांच्या टोळीला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी १७ लाख ८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मुख्य आरोपीसह अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पाचोड पोलीस ठाण्यात भाऊसाहेब लहु पवार (रा. वडीगोद्री, जि. जालना) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता अज्ञात व्यक्तींनी सोलार प्रकल्पातील डीसी केबल, कंड्यूट पाईप आणि एमसी कनेक्टरची तोडफोड करून सुमारे १ लाख १० हजार रुपयांचे केबल वायर चोरी केले. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) व ३२४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसह इतर जिल्ह्यांतही सोलार प्रकल्पांवरील केबल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी विशेष पथक स्थापन केले. स.पो.नि. पवन इंगळे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून आरोपी पवन उर्फ छन्नू महादेव काळे (रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव) याला १३ मार्च रोजी अटक केली.

चौकशीत त्याने साथीदार सुनिल बापू तपकिरे (रा. भोसा, जि. धाराशिव) याच्यासह इतरांच्या मदतीने सोलार प्रकल्पांवरील केबल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली विना नंबरची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी, तिचा मालक ईश्वर पांडुरंग गवळी (रा. येरमाळा) आणि चोरीचे केबल जाळून त्यातील तांबे खरेदी करणारा दुकानदार तवाब नवाब खान (मूळ रा. नाशिक, सध्या तेरखेडा) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरी केलेली तांब्याची तार, मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १७,०८,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसह जालना, बीड, धाराशिव, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील सोलार प्रकल्पांवर चोरी करत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

मुख्य आरोपी पवन उर्फ छन्नू काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाशी, मुरूम आणि चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यांत दरोड्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर रात्री वाहनांना जॅक टाकून लुटण्याच्या गुन्ह्यांतही तो फरार होता.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, स.पो.नि. पवन इंगळे, स.पो.नि. सुधीर मोटे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

— सोलार प्रकल्पांवरील चोरीच्या वाढत्या घटनांना या कारवाईमुळे मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांचे मत आहे.