सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा ९ वर्षांपासून अखंड उपक्रम! आजारी बहिणींना राखी, साडी आणि औषधांची प्रेमभेट
माणुसकी समूहाच्या भावंडांनी जपला बहिणींचा सण
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ :- राखी पौर्णिमा म्हटली की भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण डोळ्यांसमोर येतो. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या आणि कुटुंबीयांपासून दूर असलेल्या महिलांसाठी हा सण अनेकदा भावनिक ठरतो. अशाच आजारी बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्था, ज्युनिअर चार्ली फाउंडेशन आणि माणुसकी समूहाच्या वतीने घाटी रुग्णालयात अनोख्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली.
गेल्या ९ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत घाटी रुग्णालयातील मेडिसिन बिल्डिंगमधील महिला वॉर्ड क्रमांक ४ मध्ये उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांना राखी बांधण्यात आली. यावेळी ‘एक राखी, एक साडी’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिलेला साडी भेट देण्यात आली. तसेच काही गरजू रुग्णांना औषधांसाठी प्रत्येकी १०० रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली.
या उपक्रमादरम्यान एका महिला रुग्णाने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आम्ही तीन बहिणी… पण भाऊ गेल्यानंतर राखी साजरी करणं थांबलं. आज भाऊ गेल्यानंतर पहिल्यांदाच पुन्हा राखी बांधली. आज जणू माणुसकीच्या रूपात भाऊ परत आलाय…” हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
दरम्यान, ज्युनिअर चार्ली फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ स्वभावणे यांनी आपल्या हास्यविनोद आणि अभिनयातून रुग्णांचे मनोरंजन केले. काही काळासाठी का होईना, आजारपणाच्या वेदना विसरून रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
या स्तुत्य उपक्रमासाठी समाजसेवक सुमित पंडित यांच्या नेतृत्वाखाली माणुसकी समूहाने विशेष प्रयत्न केले. खजाना साडी सेलचे मालक इनुस खत्री यांनी साड्यांसाठी सहकार्य केले.
यावेळी प्रवीणा यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बेगमपुरा यांनी महिला रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी धीर दिला.
प्रवीणा यादव म्हणाल्या, “आजच्या समाजात माणुसकी हरवत चालली असताना रुग्णांसाठी राखी साजरी करणं हा अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रम आहे. सुमित पंडित आणि त्यांच्या माणुसकी टीमचे मनापासून अभिनंदन. रुग्णांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं हेच खरं समाजकार्य आहे.”
या कार्यक्रमाला देविदास पंडित, विजय निबाळकर, महादेव रदंवे, मनोज वखरे, राम पंडित, सौ. मिराबाई पंडित, सौ. पूजा पंडित, लक्ष्मी पंडित यांच्यासह माणुसकी समूहाचे अनेक सदस्य उपस्थित होते.
रुग्णालयाच्या भिंतींमध्ये नात्यांची ऊब हरवू नये, यासाठी माणुसकीच्या भावंडांनी बांधलेली ही राखी खऱ्या अर्थाने माणुसकीचा धागा ठरली.