समाज विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची – नवलकिशोर राम

अभियंत्यांनी तंत्रज्ञानासोबतच सामाजिक विकासासाठीही योगदान द्यावे; पुण्यात बानाईच्या राज्यस्तरीय अभियंता संमेलनात १९ जिल्ह्यांतील १५० अभियंत्यांचा सहभाग

समाज विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची – नवलकिशोर राम
समाज विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची – नवलकिशोर राम

पुणे दि १७ :- चांगले अभियंते ही समाजाची संपत्ती असून, त्यांनी केवळ विकासकामांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्वांगीण विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी. विशेषतः उपेक्षित, शोषित आणि वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी अभियंत्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई), महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अभियंता संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हा कार्यक्रम नुकताच पार पडला.

या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून इंजि. धनराज तावडे, माजी सदस्य, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, इंजि. भरतकुमार बाविस्कर, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे, इंजि. जी. एम. कंधारे, माजी सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य आणि ज्येष्ठ अभियंता इंजि. प्रदीप नगरारे उपस्थित होते.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा विभागाचे माजी अधीक्षक अभियंता इंजि. कुलदीप रामटेके होते. यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाण्याची सुरक्षा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी बानाई ही अभियंत्यांची संघटना समाजामध्ये पुढाकार घेऊन काम करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

दुपारच्या सत्रात अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रसिद्ध लेखक राजीव नंदकर यांनी ‘समाज विकासात अभियंत्यांची भूमिका’ या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. अभियंत्यांचे सामाजिक उत्तरदायित्व आणि समाजाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बानाई पुणेचे अध्यक्ष पांडुरंग शेलार यांनी प्रास्ताविक केले. स्वातंत्र्याचा आणि भारतीय राज्यघटनेचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना संविधानाच्या भावनेनुसार शोषित व वंचित घटकांना अपेक्षित लाभ आणि न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने कटिबद्ध राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संमेलनात मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना शासन सेवेत अनेक वर्षांपासून रखडलेले पदोन्नतीमधील आरक्षण लागू करावे, खासगी क्षेत्रातही आरक्षणाची अंमलबजावणी करावी, तसेच मागासवर्गीय बेरोजगार अभियंते व व्यावसायिकांना शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रातील ठेकेदारीमध्ये पाच टक्के आरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.

महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमधून सुमारे १५० अभियंत्यांनी या संमेलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंद्रशेखर जावळे यांनी केले.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित