‘सत्ताधारी पक्षच लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढतो, हे जगातील एकमेव उदाहरण’; भाजपवर मनसे अध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल
भाजपला लोकशाहीची एवढीच काळजी असेल तर गोकुळमध्ये पाच संचालकांची नियुक्ती का केली? – राज ठाकरे
मुंबई दि ६ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर लोकशाहीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे. भाजपच्या राजकीय भूमिकेतील विसंगतीवर बोट ठेवत त्यांनी गोकुळ दूध संघाच्या संचालक नियुक्तीचा दाखला दिला. सत्तेत असूनही भाजपकडून लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढले जात असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
राज ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे, तोच लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चा काढणे, हे जगातील एकमेव उदाहरण असेल, असा टोला त्यांनी लगावला.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गोकुळमध्ये भाजप पॅनलचे १२, तर सतेज पाटील पॅनलचे १३ संचालक निवडून आल्यानंतर सरकारने पाच संचालकांची नियुक्ती का केली? त्यांना मतदानाचा अधिकार देऊन भाजपला नेमके काय सिद्ध करायचे आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोकुळची निवडणूक बॅलेट पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने झाली होती. लोकशाहीची खरोखरच काळजी असती, तर अशा प्रकारच्या नियुक्त्या करण्यात आल्या नसत्या, असेही राज ठाकरे म्हणाले. गोकुळवर सत्ता मिळवता आली नाही म्हणून भाजपने आपली तत्त्वे बाजूला ठेवली आणि दुसरीकडे लोकशाही वाचवण्याच्या घोषणा दिल्या जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ, भाजपमध्ये समजूतदारपणाचा दुष्काळ!
राज्यात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा दुष्काळही पडल्याचे दिसत आहे, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला. भाजप सत्तेत असताना लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढतो आणि दुसरीकडे स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतो, अशी टीका त्यांनी केली.
देशातील दहशतवाद, कायदा-सुव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांवरही भाजपच्या भूमिकेवर त्यांनी निशाणा साधला. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याचे सांगत अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीही भाजपने मोर्चे काढावेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
‘भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे’
भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असे आवाहन करत राज ठाकरे म्हणाले की, कुठल्याही मार्गाने भाजपने मिळवलेले बहुमत विरोधी पक्षांनी गेली १२ वर्षे सहन केले आहे. मात्र, आता देशातील जनता विरोधी पक्षांकडे झुकू लागली आहे, तर भाजपनेही ही परिस्थिती सहन करायला शिकले पाहिजे.
राज ठाकरे यांच्या या टीकेमुळे भाजपच्या लोकशाहीविषयक भूमिकेवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित