सकाळी ५ वाजता आमदारकीचे प्रमाणपत्र घेतले, दुपारी थेट कामाला सुरुवात! प्रतापसिंह पाटलांची शेतकरीपुत्रांसाठी धडपड

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपयांची मदत देण्याची मागणी; विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर

सकाळी ५ वाजता आमदारकीचे प्रमाणपत्र घेतले, दुपारी थेट कामाला सुरुवात! प्रतापसिंह पाटलांची शेतकरीपुत्रांसाठी धडपड
सकाळी ५ वाजता आमदारकीचे प्रमाणपत्र घेतले, दुपारी थेट कामाला सुरुवात! प्रतापसिंह पाटलांची शेतकरीपुत्रांसाठी धडपड

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २९ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार म्हणून निवडून आलेले डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी विजयाचा आनंद साजरा करण्यापेक्षा जनहिताच्या कामाला प्राधान्य दिले आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजता आमदारकीचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर त्यांनी दुपारीच कामाला सुरुवात करत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पदवीधर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न शासनदरबारी मांडला.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक घडी विस्कळीत झाली असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणावर आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर होत आहे. विशेषतः एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यासह विविध शहरांत राहणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शहरांमध्ये राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास, भोजन, अभ्यासिका आणि शैक्षणिक साहित्याचा खर्च भागवणे कठीण होत आहे. शेतातील पिकांचे नुकसान आणि उत्पन्नात झालेली घट यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत करणेही अवघड झाले आहे.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजारांची मदत द्या!

या गंभीर परिस्थितीची दखल घेत डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पात्र पदवीधर विद्यार्थ्यांना दरमहा ४ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासनाने स्वतंत्र योजना सुरू करावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडे निवेदन सादर केले.

आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांची तयारी थांबू नये, तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा परिणाम त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक स्वप्नांवर होऊ नये, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश आहे.

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका

दुष्काळामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी शासनाने विशेष आर्थिक सहाय्य योजना राबविण्याची गरज या निवेदनातून अधोरेखित करण्यात आली आहे.

नुकतेच आमदार म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याने त्यांच्या पुढील कार्याकडे पदवीधर मतदारांसह मराठवाड्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. आता शासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित