"संदीप देशपांडे राऊतांचं पुस्तक वाचताना; ठाकरे गट-मनसे युतीच्या चर्चांना नवा उधाण!"

"संदीप देशपांडे राऊतांचं पुस्तक वाचताना; ठाकरे गट-मनसे युतीच्या चर्चांना नवा उधाण!"

महाराष्ट्र वाणी न्युज 

 मुंबई दि ५ जून :- राज ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होण्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरी हालचाली मात्र सूचक ठरत आहेत.

मनसे नेते संदीप देशपांडे, जे नेहमी ठाकरे गटावर कडाडून टीका करत आले आहेत, त्यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या फोटोमध्ये ते शिवसेना नेते संजय राऊत यांचं ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्यासोबत "लपवण्यासारखं काही नाही" असे कॅप्शन देत त्यांनी हा फोटो ट्विट केला.

हा ट्विट काहीसा अनपेक्षित असल्याने, युतीच्या शक्यतेवर अधिक गडद रंग चढले आहेत. कारण राऊतांवर सडकून टीका करणारे देशपांडे आता त्यांचंच पुस्तक वाचताना दिसणं, हे राजकीयदृष्ट्या अनेक अर्थांनी पाहिलं जात आहे.

"पुस्तक विकत घेऊन वाचलं, तरच खरा अभिप्राय देता येतो"

माध्यमांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिलं की, “मी पुस्तक वाचतोय, हे लपवण्यासारखं काहीच नाही. उलट, पुस्तक विकत घेतल्यावर खरा अभिप्राय देता येतो. भेट म्हणून मिळालेल्या पुस्तकावर खरं बोलणं कठीण जातं. त्यामुळे मी स्वतः ते पुस्तक विकत घेतलंय आणि वाचतोय.”

यापूर्वी त्यांनी पुस्तकातील तपशीलांविषयी प्रश्न उपस्थित केले होते, विशेषतः ईडीच्या चौकशीचा तपशील नसल्याबाबत. आता मात्र ते स्वतः पुस्तक वाचत असल्याने चर्चेला नवी दिशा मिळाली आहे.

 "प्रस्ताव आल्यावरच निर्णय; अनुभवाने शहाणपण"

शिवसेना-मनसे युतीबाबत विचारले असता संदीप देशपांडे म्हणाले, “प्रस्ताव आल्यावरच राजसाहेब निर्णय घेतील. आम्ही रोज 'सकारात्मक आहोत' म्हणत बसणार नाही. 2014 आणि 2017 मध्ये आम्ही पोळलो आहोत, त्यामुळे आता ताक सुद्धा फुंकून पितो.”

त्यांच्या या वक्तव्याने मनसेची सावध भूमिका अधोरेखित झाली आहे. सध्या युतीबाबत जलद हालचाली नसल्या, तरी पडद्यामागे गुप्त चर्चा सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

संदीप देशपांडे यांचा ‘नरकातला स्वर्ग’ वाचतानाचा फोटो आणि त्यांच्या स्पष्टोक्तीमुळे, ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संबंधांबाबतची उत्सुकता वाढली आहे. येत्या काही दिवसांत या चर्चांना अधिक ठोस दिशा मिळते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.