शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजारांची मदत द्या – मनसेची कृषिमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २४ (प्रतिनिधी) :- संपूर्ण महाराष्ट्रात कोसळलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान लक्षात घेऊन पंचनामे न करता सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी ठाम मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथे झालेल्या या भेटीत मनसेकडून कृषिमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. दिलीप धोत्रे म्हणाले की, “राज्यातील सर्व नद्या, वड्या पूरग्रस्त झाल्या आहेत. उभी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांची घरेसुद्धा जलमय झाली आहेत. उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ घालवू नये आणि थेट एकरी ५० हजारांची मदत जाहीर करावी.”
अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त करताना धोत्रे यांनी सरकारला थेट आर्थिक मदतीचा निर्णय घेण्याचे आवाहन केले.
या भेटीला छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, परभणी जिल्हाध्यक्ष शेखराज, विनोद मस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.