विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; ११३० दुचाकीस्वारांवर कारवाई

विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; ११३० दुचाकीस्वारांवर कारवाई
विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांचा दणका; ११३० दुचाकीस्वारांवर कारवाई

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २७ :- शहरात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवत तब्बल १ हजार १३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईतून १ लाख १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

प्राणांतिक अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, शहरातील अनेक दुचाकीस्वार अद्यापही विना हेल्मेट वाहन चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. अपघाताच्या वेळी हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होण्याच्या घटनाही घडत आहेत.

या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या १,१३० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहतूक विभागातील अधिकारी व अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

यापुढे हेल्मेटसक्तीची कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. हेल्मेट केवळ दंडापासून वाचण्यासाठी नव्हे, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वापरावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून दुचाकी चालविताना अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा, असेही पोलिसांनी सांगितले.