वाघुळखेडा शिवारात वीज कोसळून तीन महिलांचा मृत्यू; राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे पीडित कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन
पिशोर दि १९ :- कन्नड तालुक्यातील पिशोरजवळ असलेल्या वाघुळखेडा शिवारात मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळून तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे पिशोर परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेत फरजाना सय्यद हमीद (३८), तस्लीमबानो मुक्तार सय्यद (५०) आणि अलविरा हनीफ सय्यद (१६) यांचा मृत्यू झाला. वज्राघाताची ही घटना घडताच परिसरात शोककळा पसरली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी तसेच पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी कुटुंबीयांचे सांत्वन करून या दुःखाच्या प्रसंगी पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे. या दुःखाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कुटुंबीयांच्या सोबत आहे. त्यांच्या सुख-दुःखात पक्ष कायम सहभागी राहील.”
सांत्वन भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रा. सलीम शेख, तालुकाध्यक्ष प्रसन्ना पाटील, अल्पसंख्याक शहराध्यक्ष इरफान शेख, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ ढाके, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख एजाज, भगवान शेठ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
— अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित