वक्फ मालमत्तांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियन’ची स्थापना; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

वक्फ मालमत्तांच्या संरक्षणासाठी ‘महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियन’ची स्थापना; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ३ :- राज्यातील वक्फ मालमत्तांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मुतवल्ली इनामदार युनियनची स्थापना करण्यात आली आहे. या युनियनच्या माध्यमातून कायद्याच्या चौकटीत राहून मुतवल्लींच्या सहकार्याने वक्फ मालमत्तांचे रक्षण केले जाईल, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष मोईन इनामदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वक्फ मालमत्तांवर झालेल्या अवैध अतिक्रमणांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी वक्फ बोर्डाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, यासंदर्भातील विविध मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या असून त्या तातडीने पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील साडेचार लाख हेक्टरपेक्षा अधिक देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन कायदा आणण्याचा विचार व्यक्त केला आहे. मात्र, या प्रस्तावाला युनियनने तीव्र विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने १५ एप्रिल २०२५ रोजी आणि सर्वोच्च न्यायालयाने २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या आदेशांचा उल्लेख करत, मराठवाड्यातील इनामी जमिनींवर कुळ कायदा लागू होत नसल्याचे इनामदार यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने त्यामध्ये बदल करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

याशिवाय, वक्फ बोर्डाच्या कामकाजाबाबत काही महत्त्वाच्या मागण्या यावेळी पुढे करण्यात आल्या. वडिलोपार्जित पद्धतीने मुतवल्ली नेमणुका कराव्यात, वक्फ मालमत्तांची नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या कमिट्या रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

वारस हक्काच्या अनेक प्रकरणे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्यामुळे, त्या प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी वक्फ बोर्डाच्या कार्यालयात स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करावा, अशीही मागणी युनियनने केली आहे. तसेच, राज्यातील देवस्थान इनामी जमिनींवरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, असा आग्रह त्यांनी धरला.

या पत्रकार परिषदेला खुलताबादचे सलिमोद्दीन चिश्ती, टाऊन हॉलचे हसनोद्दीन शेख, जालन्याचे काजी सोहेल, जामखेडचे नदीम कादरी आणि पैठणचे शाहरुख रहेमत शेख यांची उपस्थिती होती.

👉 वक्फ मालमत्तांच्या प्रश्नावर आता संघर्षाची दिशा ठरणार का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे!