लोनचे आमिष दाखवून महिलांना निर्जनस्थळी नेऊन लुटणारा आरोपी जेरबंद; हर्सूल पोलिसांची धडक कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ :- महिलांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना मोटारसायकलवर बसवून निर्जनस्थळी नेणे आणि तेथे धमकावून सोन्याचे दागिने लुटणे, अशा प्रकारे महिलांना लक्ष्य करणाऱ्या आरोपीला हर्सूल पोलिसांनी शिताफीने अटक केली. नागोराव सुखदेव श्रीरामे (वय ३०, रा. हनकदरी, ता. सेनगाव, जि. हिंगोली, ह.मु. एस.टी. कॉलनी, सुरेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीकडून हर्सूल तसेच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील एकूण ८ लाख १८ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन लाखांच्या लोनचे आमिष
२५ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता सुमन रामदास औटी (वय ४६, रा. गुरुचरन रेसिडेन्सी, हर्सूल) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उभ्या असताना आरोपी नागोराव श्रीरामे याने त्यांना दोन लाख रुपयांचे लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
त्यानंतर आरोपीने महिलेला आपल्या मोटारसायकलवर बसवून नगर नाका पुलाच्या पुढे तिसगाव रोडवरील एका शेताजवळ नेले. तेथे दुपारी सुमारे १२.४५ वाजता त्याने महिलेला धमकावून तिच्याकडील सोन्याचे दागिने लुटले आणि घटनास्थळावरून पसार झाला.
या प्रकरणी १० ऑगस्ट रोजी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३१८(४) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन किलोमीटर पाठलाग करून आरोपीला पकडले
गुन्ह्याचा तपास सुरू असताना हर्सूल पोलिसांच्या डी.बी. पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी एस.टी. कॉलनी, सुरेवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. आरोपी बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक स्वाती केदार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने कारवाई केली.
पोलिसांचे पथक परिसरात पोहोचताच आरोपीने पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सुमारे दोन किलोमीटर पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आठ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पोलीस कोठडीत चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली देत लुटलेला मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. त्याच्याकडून १० ग्रॅम वजनाचा सुमारे १ लाख ३० हजार ७०० रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस, ४ तोळे ८ ग्रॅम वजनाचे सुमारे ६ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण आणि ४० हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल (MH-20-CJ-0978) जप्त करण्यात आली.
पुंडलिकनगर हद्दीतील गुन्हाही उघड
तपासादरम्यान आरोपीने पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही याच पद्धतीने एका महिलेला लक्ष्य केल्याचे समोर आले. वर्षा अरविंद सानप यांना सिडको पुलाजवळून मोटारसायकलवर बसवून अयोध्यानगर-कर्णपुरा परिसरातील निर्जनस्थळी नेण्यात आले होते. तेथे त्यांच्या कानातील सोन्याच्या रिंगा बळजबरीने हिसकावून घेण्यात आल्या होत्या.
या गुन्ह्यातील २६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन रिंगाही पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केल्या.
अशाप्रकारे हर्सूल पोलिसांनी दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एकूण ८ लाख १८ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल जप्त केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, सिडको विभाग मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वाती केदार, पोलीस उपनिरीक्षक रफीक शेख, सफौ सुभाष शेवाळे, पोलीस अंमलदार फिरोज तडवी, आकाश जायभाये, मोहन सिंगल तसेच महिला पोलीस अंमलदार निर्मला कोलते यांच्या पथकाने केली.
आरोपीने अशाच पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रफीक शेख करीत आहेत.