"युरिया गायब, पीक रडतंय – नेते बॅनर लावतायत!" शेतकऱ्याची जळती वेदना, ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या कवितेतून व्यक्त

"युरिया गायब, पीक रडतंय – नेते बॅनर लावतायत!" शेतकऱ्याची जळती वेदना, ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या कवितेतून व्यक्त

महाराष्ट्र वाणी न्युज 

गंगापुर दि २६ जुलै :- "गेला युरिया कुणीकडे ग बाई गेला युरिया कुणीकडे" — अशा आर्त सुरात शेतकऱ्याच्या व्यथा आणि व्यवस्थेचा पर्दाफाश करणारी कविता सध्या चर्चेत आहे. शेतकरी आणि कवी ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या ओळी सरकार, व्यापारी आणि सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवतात, जेव्हा युरियाच्या टंचाईमुळे शेतीचं भवितव्य धोक्यात आलं आहे.

व्यापाऱ्यांच्या दारात रडणारा शेतकरी, पिवळी पडलेली पिकं, दुकानदारांच्या गुप्त बॅगा आणि सत्ताधाऱ्यांचे वाढदिवसाचे बॅनर्स... या विरोधाभासांनी भरलेली ही कविता "शेतकऱ्यांची लूट आणि सत्ताधाऱ्यांची झूट" अधोरेखित करते.

"शेतकरी उपाशी राहतो, पण सत्ता उपभोगते", अशी घणाघात करणारी ओळ व्यवस्था ढवळून टाकते. शिवाजी महाराजांच्या रयतेला आज खायला खत नाही, पण नेत्यांच्या जाहिरातींना खर्च मात्र अनियंत्रितपणे चालतो, असा स्पष्ट संदेश कवितेतून उमटतो.

गेला युरिया कुणीकडे?

गेला युरिया कुणीकडे ग बाई गेला युरिया कुणीकडे

व्यापाऱ्यामागे धावे शेतकरी,

खतासाठी हे पीक रडे 

गेला युरिया कुणीकडे....?

पिके झाली पिवळी रानात 

सरकार बोले व्यापाऱ्याच्या कानात

वाटा आमचा तुमच्या धनात

शेतकऱ्याचे मढे त्याला रोजच कोण रडे...?

गेला युरिया कुणीकडे.....

युरिया गायब दुकानातूनी 

फोटो पेपरच्या पानोपानी 

जरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

तरी भाऊंच्या वाढदिवसाचे गावात बॅनर खडे

गेला युरिया कुणीकडे......

 दुकानात नाही, नाही शेतात 

 निमकोट युरिया कुणाच्या नाही हातात 

 शोध शोधूनी अधिकारी आले वातात

 सावरले तेव्हा जेव्हा त्यांच्या बँगेत पैसे पडे

 गेला युरिया कुणीकडे.....

शेतकऱ्याची चालवली लूट

सगळे म्हणतात त्यालाच उठ

उपाशी राहून तुमची तो भरतो तूट

नेत्या मागे धावती पोर युरिया साठी बाप रडे 

गेला युरिया कुणीकडे.....

पीक म्हणाले शेतकऱ्याला 

भाव तुझा का खाली आला

तुझेच खाऊनी म्हणतो साला

तू उपाशी, ते खाती सत्तेचे तूप वडे

गेला युरिया कुणीकडे.....

रयतेसाठी लढले शिवबा

कसे निपजले इथे खाऊबा 

तळतळाटाने शेतकरी म्हणे सायबा 

कष्टाच खाणाऱ्यावर पडतील का किडे 

गेला युरिया कुणीकडे...

🧑‍🌾 कविता केवळ शब्द नाही – ती शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी आहे!

🌾 'गेला युरिया कुणीकडे' हा प्रश्न आता जनतेचाच आहे!