महापालिकेची कर थकबाकीदारांवर मोठी कारवाई; एकाच दिवशी २६ मालमत्ता सील, ६४.९१ लाखांची वसुली

महापालिकेची कर थकबाकीदारांवर मोठी कारवाई; एकाच दिवशी २६ मालमत्ता सील, ६४.९१ लाखांची वसुली
महापालिकेची कर थकबाकीदारांवर मोठी कारवाई; एकाच दिवशी २६ मालमत्ता सील, ६४.९१ लाखांची वसुली

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २ :- महानगरपालिकेने कर थकबाकीदारांविरोधात सुरू केलेली विशेष वसुली मोहीम सलग तिसऱ्या आठवड्यातही आक्रमकपणे सुरू ठेवली असून, गुरुवारी (२ जुलै) करण्यात आलेल्या कारवाईत एकाच दिवसात तब्बल २६ मालमत्ता सील करण्यात आल्या. या कारवाईदरम्यान एकूण ६४ लाख ९१ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला.

मागील आठवड्यात कर वसुली मोहिमेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व १० झोनमध्ये पुन्हा विशेष मोहीम राबवण्यात आली. आयुक्तांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे आणि उपआयुक्त विकास नवाळे यांनी प्रत्येक झोनमध्ये १५ ते २० मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून संबंधित पथकांना कारवाईचे निर्देश दिले होते.

त्यानुसार दिवसभर झोननिहाय पथकांनी मोठ्या थकबाकीदारांविरोधात कारवाई करत मालमत्ता सील करणे आणि कर वसुलीची प्रक्रिया राबवली.

झोननिहाय कारवाईत झोन १ मध्ये १० मालमत्ता सील करण्यात आल्या, तर झोन २ मध्ये ४ मालमत्ता सील करून ५८ हजार ७१२ रुपयांची वसुली झाली. झोन ३ मध्ये २ मालमत्ता सील करत १.९४ लाख रुपये वसूल करण्यात आले. झोन ४ मध्ये १ मालमत्ता सील करून ४.६१ लाखांची वसुली झाली.

झोन ५ मध्ये ३ मालमत्ता सील करण्यात आल्या, तर झोन ६ मध्ये २ मालमत्ता सील करून १ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. झोन ७ मध्ये १ मालमत्ता सील करून १५.५९ लाखांची वसुली झाली. झोन ८ मध्ये १ मालमत्ता सील करण्यात आली.

झोन ९ मध्ये कोणतीही मालमत्ता सील करण्यात आली नसली तरी १२.१९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. तर झोन १० मध्ये २ मालमत्ता सील करून तब्बल २९ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला.

या विशेष मोहिमेद्वारे एकूण २६ मालमत्ता सील करण्यात आल्या असून, ६४.९१ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. आगामी काळातही थकबाकीदारांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

"कर थकबाकी टाळा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल; महापालिकेचा इशारा आता अधिक कठोर होताना दिसत आहे."