मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; आमदार विलास भुमरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या मदतीची मागणी

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; आमदार विलास भुमरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या मदतीची मागणी
मराठवाड्यात दुष्काळाचे सावट; आमदार विलास भुमरेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे तातडीच्या मदतीची मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ८ :- पावसाने ओढ दिल्याने पैठण तालुक्यासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांनी आज मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मराठवाड्यातील शेतकरी आणि नागरिकांसमोर निर्माण झालेल्या विविध अडचणींबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता असून, आगामी काळातील संभाव्य संकटाबाबतही आमदार भुमरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले.

या परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांना तातडीने विशेष मदत उपलब्ध करून द्यावी, आवश्यक उपाययोजना राबवाव्यात तसेच शासनाच्या विविध सवलती आणि मदत योजनांचा लाभ बाधित नागरिकांना मिळवून द्यावा, अशी मागणी भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

मराठवाड्यातील सद्यस्थिती अत्यंत संवेदनशील असून, संकटाच्या काळात शासनाने सकारात्मक आणि तातडीने निर्णय घेऊन शेतकरी व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले.