मनपा शाळांच्या ग्रंथालयांसाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून ४० हजारांची पुस्तके दान

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी पुढाकार; १ लाख नव्हे, तर १६२ ज्ञानवर्धक पुस्तकांची भेट

मनपा शाळांच्या ग्रंथालयांसाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून ४० हजारांची पुस्तके दान
मनपा शाळांच्या ग्रंथालयांसाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून ४० हजारांची पुस्तके दान

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची वैचारिक जडणघडण व्हावी, या उद्देशाने महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ग्रंथालयांसाठी पुस्तकदान उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला प्रतिसाद देत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सुमारे ४० हजार २१० रुपये किमतीची १६२ ज्ञानवर्धक पुस्तके मनपा शाळांच्या ग्रंथालयांसाठी दान केली आहेत.

महानगरपालिकेने वृत्तपत्राद्वारे नागरिकांना वाचनीय पुस्तके दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाच्या पहिल्याच दिवशी जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत स्वतः खरेदी केलेली तसेच भेट स्वरूपात मिळालेली पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. त्यांनी ही पुस्तके मनपा उपायुक्त अंकुश पांढरे आणि कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांच्याकडे सुपूर्द केली.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियाना’अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मनपा शाळांमध्ये ग्रंथालये विकसित करून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील विविध विषयांचे वाचन करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

जी. श्रीकांत यांनी यापूर्वी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत असताना मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले होते. आता पुस्तकदानाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी योगदान दिले आहे.

यावेळी बोलताना विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आणि वैचारिक जडणघडणीत वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महापालिकेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, समाजातील प्रत्येक घटकाने आणि स्वयंसेवी संस्थांनी या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना समृद्ध वाचनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.”

मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे पुस्तकदानासाठी नागरिक आणि सामाजिक संस्थांना प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देऊन त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी समाजातील विविध घटकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित