मनपाचे दत्ता सरोदे आणि विनोद विभुते यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा फडकावत ऐतिहासिक कामगिरी!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २७ :- येथील गिर्यारोहक तथा महानगरपालिका कर्मचारी दत्ता रामदास सरोदे (वय ५०) आणि त्यांचे सहकारी विनोद विभुते (वय ४४) यांनी नेपाळमधील माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ५३६४ मीटर उंचीवर भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा अभिमानाने फडकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
दिनांक २५ मे २०२६ रोजी उणे तापमान आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत त्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. या साहसी मोहिमेमुळे छत्रपती संभाजीनगरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दत्ता सरोदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असून गिर्यारोहण क्षेत्रात त्यांची विशेष ओळख आहे. यापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सन २०२३ मध्ये आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो तसेच सन २०२४ मध्ये युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रसवरही भारतीय तिरंगा फडकावला होता.
एव्हरेस्ट बेस कॅम्पवरील ही मोहीम त्यांचे तिसरे आंतरराष्ट्रीय यश ठरले असून, त्यांच्या या पराक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे।
“जिद्द, धैर्य आणि देशप्रेमाच्या बळावर संभाजीनगरचे नाव पुन्हा जगाच्या उंच शिखरावर पोहोचले!”