पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांचा दारू माफियांवर मोठा प्रहार; गणेश पवार एमपीडीए अंतर्गत तडीपार

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांचा दारू माफियांवर मोठा प्रहार; गणेश पवार एमपीडीए अंतर्गत तडीपार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत सराईत गावठी दारू माफिया गणेश महादेव पवार (वय 34, रा. ढाकेफळ, ता. पैठण) याच्यावर महाराष्ट्र धोकादायक कृती प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्याला एका वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अवैध धंदे आणि संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर मोहीम राबविण्यात येत आहे. एम. पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश पवार हा गावठी हातभट्टी दारूची बेकायदेशीर निर्मिती व विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलीस तपासात आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून अवैध दारूचा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले. तो तयार करत असलेल्या दारूमध्ये कोणत्याही घटकांचे निश्चित प्रमाण नसल्याने ती मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरत होती. त्यामुळे ढाकेफळ व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता.

गणेश पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत कलम 65 (ई)(फ) अन्वये सहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.

पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि एम. पैठण पोलिसांनी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्याकडे पाठविला. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जून 2026 रोजी स्थानबद्धतेचा आदेश जारी केला. त्यानुसार 10 जून रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अकोला जिल्हा कारागृहात दाखल केले.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत तसेच स्थानिक गुन्हे शाखा व एम. पैठण पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे विश्वासार्ह अपडेट!