“पैज लावा, रस्ता चालवून दाखवा!” – भाऊसाहेब शेळके पाटील यांचे आमदार बंब यांना थेट आव्हान

“पैज लावा, रस्ता चालवून दाखवा!” – भाऊसाहेब शेळके पाटील यांचे आमदार बंब यांना थेट आव्हान
“पैज लावा, रस्ता चालवून दाखवा!” – भाऊसाहेब शेळके पाटील यांचे आमदार बंब यांना थेट आव्हान

महाराष्ट्र वाणी न्युज 

गंगापूर, दि. २७ जुलै :- “आमदार साहेबांनी अनेक पैजा जिंकल्या आहेत, असं मी ऐकलं... पण आता ही पैज तुमच्यासमोर आहे!” अशा शब्दांत ग्रामस्थ नेते भाऊसाहेब शेळके पाटील यांनी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांना थेट रस्त्यावर उतरूनच आव्हान दिलं आहे.

शेळके पाटील यांनी जाहीर वक्तव्यात म्हटलं की, “धनगरपट्टी रोड ते जय बाबाजी नगर शेतवस्ती या अवघ्या दोन किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यावर आमदार बंब यांनी डबल सीट मोटारसायकल चालवून दाखवावी. जर त्यांनी हे जमवलं, तर मी त्यांना स्वतःच्या खिशातून ११ हजार रुपयांची रोख पैज देईन. पण जर त्यांना हे शक्य झालं नाही, तर त्यांनी या रस्त्याचा तातडीने विकास करावा.”

गावातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्ड्यांनी भरलेला आहे. पावसाळ्यात तर हा रस्ता अक्षरशः चिखलाने भरतो आणि ये-जा करणे कठीणच नव्हे, तर धोकादायक ठरते.

शेळके पाटील पुढे म्हणाले, “मी आमदार बंब यांच्यावर वैयक्तिक टीका करत नाही, पण ते जर खरंच जनतेच्या अडचणी समजून घेत असतील, तर अशा रस्त्यावर स्वतः एकदा तरी मोटारसायकल चालवून पाहावं. नुसता बोलाचा भात नको, कृतीतून विकास दिसला पाहिजे.”

या वादग्रस्त आणि थेट भाषेतील आव्हानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, स्थानिक जनतेत चर्चेला उधाण आलं आहे. आमदार बंब या पैजेचा स्वीकार करतात का, की रस्त्याच्या विकासावर लक्ष केंद्रीत करतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

 “विकासाचं राजकारण करायचं असेल, तर जनता आता 'पैज' लावते!”