पाण्याची नासाडी आणि अनधिकृत नळ जोडण्यांवर मनपाची धडक मोहीम; चौथ्या उल्लंघनावर थेट पोलीस कारवाई
५ हजारांपासून २५ हजार रुपयांपर्यंत दंड; जलवाहिन्या आणि टँकरमधील गळती रोखण्यासाठी विशेष मोहीम
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच पाण्याची नासाडी आणि अनधिकृत नळ जोडण्यांना आळा घालण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्याची तयारी केली आहे. बेकायदेशीर नळ जोडण्यांचा शोध घेऊन त्या खंडित करणे, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे आणि आवश्यकतेनुसार पोलीस गुन्हे दाखल करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात शहरातील पाणी वितरण व्यवस्था, पाणीगळती रोखणे आणि अनधिकृत पाणी वापराविरुद्ध कारवाई करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण अधिकारी तिनगोटे, कार्यक्रम अधिकारी सांगळे तसेच पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध घेऊन कारवाई
शहरात विनापरवाना नळ जोडण्या घेऊन पाणी वापरणाऱ्यांविरुद्ध विशेष शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. आढळलेल्या अनधिकृत जोडण्या खंडित करण्यासोबतच संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना अधिकृत नळ जोडणी घेण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाणीगळती रोखण्याला प्राधान्य
मुख्य जलवाहिन्या आणि अंतर्गत वितरण वाहिन्यांमधून होणारी पाणीगळती तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरमधील गळती पुढील दहा दिवसांत बंद करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन उपलब्ध पाण्याचा अधिक प्रभावी वापर करता येणार आहे.
नियमभंग केल्यास टप्प्याटप्प्याने दंड
पाण्याची नासाडी करणाऱ्या तसेच अनधिकृतरीत्या पाण्याचा वापर करणाऱ्यांविरुद्ध प्रस्तावित कारवाईच्या स्वरूपानुसार पुढील दंडात्मक टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.
- पहिल्यांदा उल्लंघन : ५ हजार रुपये दंड
- दुसऱ्यांदा उल्लंघन : १० हजार रुपये दंड
- तिसऱ्यांदा उल्लंघन : २५ हजार रुपये दंड
- चौथ्यांदा उल्लंघन : पोलीस गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई
जनजागृतीसाठी नागरिकांचा सहभाग
पाण्याची बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी न राहता लोकचळवळ बनावी, यासाठी विविध प्रभागांत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या माध्यमातूनही माहिती, शिक्षण व संवाद (IEC) उपक्रम राबवून पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
संयुक्त पथकांची क्षेत्रीय गस्त
अनधिकृत नळ जोडण्या शोधण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी लाईनमन, कनिष्ठ अभियंते आणि नागरी मित्र पथक यांच्या संयुक्त पथकांमार्फत प्रभागांमध्ये गस्त घालण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणी करून नियमभंग आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.
नागरिकांना मनपाचे आवाहन
शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी पाण्याची नासाडी आणि अनधिकृत जोडण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. अनधिकृत नळ जोडण्या असलेल्या नागरिकांनी त्या अधिकृत करून घ्याव्यात; अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित