‘देश संकटात आहे तर सत्य स्पष्ट करा’; अंबादास दानवे यांचे पंतप्रधान मोदींना थेट सवाल
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि ११ :- पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना काटकसरीचे आवाहन केले होते. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवा तसेच एक वर्ष सोने खरेदी टाळा, असे आवाहन त्यांनी केले होते. यावरून आता Ambadas Danve यांनी केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारत एक्स (X) वरून निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की, देश संकटाच्या काळात नेहमीच एकजुटीने उभा राहिला आहे. मात्र, पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर सरकारने देशासमोर परिस्थितीची स्पष्ट माहिती मांडणे गरजेचे आहे. “देश संकटात आहे तर त्या संकटाचे नेमके स्वरूप काय? ते किती गंभीर आहे? याची आकडेवारीसह माहिती सरकारने जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
इंधन बचतीच्या आवाहनावर प्रश्न उपस्थित करताना दानवे यांनी विचारले की, देशाला दररोज किती इंधन लागते आणि वापर किती टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारसमोर आहे? तसेच “सोने खरेदी करू नका” असे सांगितल्यामुळे सुवर्ण व्यवसायाशी संबंधित लाखो कामगार आणि व्यापाऱ्यांच्या रोजगाराचे काय होणार, याचे उत्तरही सरकारने द्यावे, असे ते म्हणाले.
शेतीच्या हंगामाचा उल्लेख करत त्यांनी विचारले की, सध्या देशभरात शेतीची कामे सुरू असताना कृषी क्षेत्रासाठी लागणाऱ्या इंधनावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत ना? तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य असले तरी काही दिवसांत सुरू होणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे नियोजन सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांच्या वापराच्या मुद्द्यावर बोलताना दानवे यांनी देशाच्या गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक खत निर्मितीची क्षमता सध्या उपलब्ध आहे का, असा सवाल उपस्थित केला.
अंबादास दानवे यांच्या या प्रश्नांमुळे पंतप्रधानांच्या आवाहनावरून राजकीय चर्चांना वेग आला असून, केंद्र सरकार यावर काय भूमिका मांडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातील प्रत्येक मोठ्या घडामोडींचे अचूक आणि सविस्तर अपडेट्स मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र वाणी’सोबत जोडलेले रहा!