दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील सर्व ८७ हजार १७४ अर्जांना मंजुरी

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील सर्व ८७ हजार १७४ अर्जांना मंजुरी
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेततळे योजनेच्या प्रतीक्षा यादीतील सर्व ८७ हजार १७४ अर्जांना मंजुरी

जळगाव । दि २० :- संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वैयक्तिक शेततळे योजनेच्या महा-डीबीटी पोर्टलवरील प्रतीक्षा यादीतील सर्व अर्जांची म्हणजेच १०० टक्के अर्जांची निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल ८७ हजार १७४ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे सन २०२६-२७ मध्ये संभाव्य दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला संरक्षित सिंचनाची सुविधा मिळावी, तसेच पावसाचे पाणी साठवून त्याचा गरजेच्या वेळी उपयोग करता यावा, या उद्देशाने अनुदान तत्त्वावर वैयक्तिक शेततळे योजना राबविण्यात येते.

या निर्णयानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील ३ हजार ९२५, अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५ हजार ३७९ आणि इतर प्रवर्गातील ७७ हजार ८७० शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशा एकूण ८७ हजार १७४ शेतकऱ्यांना आता पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

कागदपत्रांसाठी ३० दिवसांची मुदत

निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी महा-डीबीटी (आपले सरकार) पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये हमीपत्र (परिशिष्ट-२), तसेच आवश्यकतेनुसार जातीचा दाखला किंवा दिव्यांग प्रमाणपत्राचा समावेश आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी एसएमएस प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ही कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. कागदपत्रे स्पष्ट आणि अद्ययावत असावीत. विहित मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास संबंधित शेतकऱ्यांची निवड रद्द केली जाणार आहे.

पूर्वसंमतीनंतरच शेततळ्याचे काम सुरू करा!

योजनेच्या पुढील टप्प्यांबाबत शेतकऱ्यांना मोबाईल एसएमएस आणि महा-डीबीटी पोर्टलद्वारे सूचना दिल्या जाणार आहेत. निवड झाल्यानंतर पूर्वसंमती मिळवणे आणि त्यानंतर योजनेतील सर्व अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत शेततळ्याचे काम पूर्ण करणारे शेतकरीच अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत.

त्यामुळे निवड झालेल्या शेतकऱ्यांनी मोबाईलवरील संदेश तपासून आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित