दुष्काळग्रस्त जनतेने घाबरू नये; चारा छावण्या, रोजगार आणि पाणीपुरवठ्यासाठी उपाययोजना करणार – आ. अब्दुल सत्तार
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील जनतेला आवाहन; पशुधन कमी भावात विकू नका, गाव सोडून स्थलांतर करू नका
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पावसाअभावी पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर बनत असताना, सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जनतेला धीर देत दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
“दुष्काळ निवारणासाठी मी आहे, कोणीही घाबरून जाऊ नये,” असे आवाहन करत त्यांनी शेतकरी, पशुपालक आणि ग्रामस्थांनी संकटाच्या काळात संयम राखण्याचे आवाहन केले.
जनावरे कमी भावात विकू नका
दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पशुपालकांनी आपली मुकी जनावरे अडचणीपोटी कमी भावात विकू नयेत, असे आ. अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. जनावरांच्या संगोपनासाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लवकरच चारा छावण्या सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
गाव सोडून स्थलांतर करू नका
दुष्काळाच्या परिस्थितीत रोजगार आणि पाण्याच्या शोधात नागरिकांना गाव सोडण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. गावातील नागरिकांनी घाबरून स्थलांतर करू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतमजुरांना लवकरच काम उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी उपाययोजना करण्याचे आश्वासन
दुष्काळग्रस्त भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आ. अब्दुल सत्तार यांनी आपल्या आवाहनातून स्पष्ट केले. चारा, रोजगार आणि पाणीटंचाईसारख्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करा
सध्याच्या परिस्थितीत पाण्याचे महत्त्व लक्षात घेता, प्रत्येकाने आपल्या विहिरीतील आणि बोअरवेलमधील पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याचा अपव्यय टाळून उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पिकांना पाणी देणे टाळण्याचे आवाहन
पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने शेतकऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीत पिकांना पाणी देणे टाळावे, असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले. उपलब्ध पाणीसाठा जपून ठेवणे आणि त्याचा वापर प्राधान्याने पिण्याच्या पाण्यासाठी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी राहण्याची ग्वाही
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी निराश न होता परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले आहे. चारा छावण्या, रोजगाराच्या संधी आणि पाणीटंचाईवरील उपाययोजनांबाबत त्यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे आता संबंधित उपाययोजना प्रत्यक्षात कधी सुरू होतात, याकडे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अखलाख देशमुख - महाराष्ट्र वाणी