दुःखावर मात, जिद्दीचा विजय! वडिलांच्या निधनानंतरही परीक्षा देत मिळवले यश
महाराष्ट्र वाणी
अहिल्यानगर( अहमदनगर) दि १८ :- प्रतिकूल परिस्थितीसमोर न झुकता जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या बळावर यश संपादन करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील वन्नाळी येथील अभिमन्यू लक्ष्मी अर्जुन कोरेवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत महसूल सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
ग्रामीण भागात शिक्षण घेतलेल्या अभिमन्यू यांनी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांचे वडील अर्जुन कोरेवार हे पोलिस खात्यात कार्यरत होते. मात्र पॅरलेसिसच्या आजारामुळे ते दीर्घकाळ अंथरुणाला खिळून होते. वडिलांनी पाहिलेले खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिमन्यू सातत्याने प्रयत्नशील होते.
स्पर्धा परीक्षांच्या प्रवासात त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. तब्बल नऊ मुख्य परीक्षा दिल्यानंतरही अंतिम यादीत नाव येत नव्हते. PSI, राज्यसेवा, कर सहाय्यक यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मुख्य टप्पा पार करूनही अंतिम निवड हुकत राहिली. तरीही त्यांनी हार मानली नाही.
दरम्यान, ३० मे २०२५ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगानंतर अवघ्या दोन दिवसांनी, २ जून रोजी महसूल सहाय्यक पदाची लेखी परीक्षा होती. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही अभिमन्यू यांनी मानसिक धैर्य दाखवत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या अस्थिविसर्जनाच्या विधीऐवजी त्यांनी परीक्षा केंद्र गाठले आणि आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवले.
या संघर्षाचे फळ अखेर ९ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालातून मिळाले. महसूल सहाय्यक पदासाठी त्यांची निवड झाली आणि त्यांच्या मेहनतीला यशाची किनार मिळाली. मात्र हे यश पाहण्यासाठी वडील आज हयात नसल्याची खंत त्यांच्या मनात कायम आहे.
अभिमन्यू कोरेवार यांची ही यशोगाथा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून, संकट कितीही मोठे असले तरी जिद्द आणि सातत्य असेल तर यश निश्चित मिळते, हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.
👉 संघर्ष कितीही कठीण असला तरी ध्येयाप्रती असलेली निष्ठा यशाचा मार्ग नक्कीच खुला करते; अभिमन्यू कोरेवार यांची कहाणी याचेच जिवंत उदाहरण आहे.