दिवाळीत जवाहरनगर पोलिसांची नागरिकांना अनमोल भेट! दोन वर्षांपूर्वी हरवलेले मोबाईलही शोधले; २८ लाखांचे १२५ मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ५ :- दिवाळीच्या सणात जवाहरनगर पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे. हरवलेले आणि चोरीस गेलेले तब्बल १२५ महागडे मोबाईल फोन शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले. विशेष म्हणजे, या मोबाईलची एकूण किंमत तब्बल २८ लाख रुपये असून, काही नागरिकांचे मोबाईल दोन वर्षांपूर्वी हरवले होते. त्यामुळे मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या या उल्लेखनीय कामगिरीत आयफोन, सॅमसंग, वन प्लस, विवो, मोटोरोला आणि ओप्पो यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या महागड्या मोबाईलचा समावेश आहे. पोलीस अमलदार मारोती गोरे आणि राजेंद्र शिंदे यांनी तांत्रिक तपास व सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून हे मोबाईल शोधून काढले.
पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
५ नोव्हेंबर रोजी मोबाईलचे नागरिकांना वाटप
५ नोव्हेंबर २०२६ रोजी त्रिदेवता मंदिर, सिडको पोलीस स्टेशन, एन-७, सिडको येथे आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते शोधून काढलेले १२५ मोबाईल संबंधित नागरिकांच्या स्वाधीन करण्यात आले.
दोन वर्षांनंतर मोबाईल मिळाल्याने नागरिक भावूक!
या कार्यक्रमातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे दोन वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याचा आनंद. मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता. मोबाईलमध्ये असलेली महत्त्वाची माहिती, छायाचित्रे आणि आठवणी पुन्हा मिळाल्याने अनेक नागरिक भावूक झाले.
यावेळी तीन महिला आणि दोन पुरुष अशा पाच नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करून जवाहरनगर पोलिसांचे आभार मानले. दोन वर्षांपूर्वी हरवलेला मोबाईल पुन्हा मिळेल, अशी आशा सोडून दिली होती; मात्र पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे तो पुन्हा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक
हरवलेला मोबाईल परत मिळणे म्हणजे केवळ एक वस्तू मिळणे नसून त्यासोबत जोडलेल्या आठवणी आणि भावना पुन्हा मिळण्यासारखे आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांच्या हरवलेल्या वस्तू शोधून त्या त्यांच्या स्वाधीन करण्याचे सामाजिक उत्तरदायित्वही जवाहरनगर पोलिसांनी या कामगिरीतून अधोरेखित केले आहे.
दिवाळीच्या सणात १२५ नागरिकांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने अनेक कुटुंबांच्या आनंदात भर पडली आहे. जवाहरनगर पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे नागरिकांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित