दहिगाव वीज दुर्घटना; अब्दुल सत्तारांच्या पाठपुराव्याने दुधे कुटुंबाला ८ लाखांची शासकीय मदत

दहिगाव वीज दुर्घटना; अब्दुल सत्तारांच्या पाठपुराव्याने दुधे कुटुंबाला ८ लाखांची शासकीय मदत
दहिगाव वीज दुर्घटना; अब्दुल सत्तारांच्या पाठपुराव्याने दुधे कुटुंबाला ८ लाखांची शासकीय मदत

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड डि २० :- सिल्लोड तालुक्यातील दहिगाव शिवारात वीज कोसळून मृत्यू झालेल्या मनोहर दुधे आणि पार्वताबाई दुधे यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एकूण ८ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. मृतांच्या वारस पंढरी मनोहर दुधे यांच्याकडे प्रत्येकी ४ लाख रुपयांप्रमाणे ८ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी दहिगाव शिवारात वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू असताना मनोहर दुधे, पार्वताबाई दुधे आणि त्यांचा मुलगा पंढरी दुधे यांनी एका झाडाखाली आसरा घेतला होता. त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने मनोहर दुधे आणि पार्वताबाई दुधे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत पंढरी दुधे किरकोळ जखमी झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी दहिगाव येथे भेट देऊन दुधे कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले होते. तसेच मृतांच्या वारसांना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

यानंतर प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत मदत मंजूर करण्यात आली. त्यानुसार नैसर्गिक आपत्तीत मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही व्यक्तींच्या वारस पंढरी दुधे यांना प्रत्येकी ४ लाख रुपये याप्रमाणे एकूण ८ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या दहिगाव येथील निवासस्थानी जाऊन सुपूर्द करण्यात आला.

या कठीण प्रसंगी शासनाकडून मिळालेल्या मदतीमुळे दुधे कुटुंबाला आधार मिळाला असून, कुटुंबाला आवश्यक असलेल्या पुढील मदतीसाठीही सहकार्य करण्याची भूमिका आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली.

यावेळी तहसीलदार सागर वाघमारे, मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पा. गाढे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश ताठे, संचालक नंदकिशोर सहारे, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, महसूल कर्मचारी दुर्गेश गिरी यांच्यासह सरपंच नाना पांढरे, पोलीस पाटील रत्नाकर सुरडकर, माजी सरपंच गणेश दुधे आणि ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.