"दरोड्याआधीच पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! स्कॉर्पिओसह टोळी जेरबंद"

"दरोड्याआधीच पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! स्कॉर्पिओसह टोळी जेरबंद"
"दरोड्याआधीच पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक! स्कॉर्पिओसह टोळी जेरबंद"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ६ :- बिडकीन परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरणाऱ्या टोळीवर बिडकीन पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. या कारवाईत पोलिसांनी स्कॉर्पिओ वाहनासह एकूण ५ लाख २० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना ४ जुलै रोजी पहाटे बिडकीन DMIC परिसरातील सेक्टर क्र. १९, शिवनाई शिवार भागात एका पांढऱ्या स्कॉर्पिओमधून काही इसम दरोड्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी सापळा रचला. संशयित स्कॉर्पिओला थांबण्याचा इशारा देण्यात आला; मात्र चालकाने वाहन भरधाव वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. यावेळी दोन आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले, तर तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अटक आरोपींमध्ये रईस शेख शहीर, अमोल काशीनाथ खरात आणि रईस शेख युनूस यांचा समावेश आहे.

आरोपींकडून स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल फोन, दोर, कटर, स्क्रू ड्रायव्हर, हेक्झा ब्लेड यासारखे साहित्य जप्त करण्यात आले. तपासादरम्यान आरोपींवर यापूर्वी चोरी, दरोडा आणि गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचेही उघड झाले आहे.

या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१०(४), ३१०(५) तसेच इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना करत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस पथकाने केली.

वाचत राहा महाराष्ट्र वाणी – तुमच्या परिसरातील प्रत्येक मोठी बातमी सर्वात आधी!