त्रिमूर्ती चौकात कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी रोहन गवळीला जवाहरनगर पोलिसांच्या बेड्या
महाराष्ट्र वाणी 📰✍️
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २ :- त्रिमूर्ती चौक परिसरात एका व्यक्तीवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. रोहन दुर्गादास गवळी (वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी रात्री फिर्यादी अरुण उत्तम जोगदंडे (वय ३९, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी) हे जेवणानंतर त्रिमूर्ती चौकात त्यांचा मित्र अरुण काथार याच्या हातगाडीवर बोलत उभे होते. रात्री सुमारे १० वाजेच्या दरम्यान अचानक त्यांच्या पाठीमागे कोणीतरी आल्याची जाणीव झाल्याने त्यांनी मागे वळून पाहिले.
त्यावेळी परिसरात नेहमी फिरणारा रोहन गवळी हा हातात धारदार कोयता घेऊन उभा असल्याचे त्यांना दिसले. कोणतेही स्पष्ट कारण नसताना आरोपीने जिवे मारण्याच्या उद्देशाने जोगदंडे यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हाताने वार अडविल्याने त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे जोगदंडे घाबरले असून, आरोपीच्या कोयत्याचे वार त्यांच्या दोन्ही हातांवर बसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर महेंद्र खरात यांनी जखमी जोगदंडे यांना तातडीने जवळील हेडगेवार रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ईएसआय रुग्णालयात हलविण्यात आले.
फिर्यादीच्या एमएलसी जबाबावरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे करीत आहेत.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार आरोपीचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे २ वाजता पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि राजेंद्र शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हल्ल्यातील आरोपी रोहन गवळी हा शांतिनिकेतन कॉलनी परिसरातील एका कार पार्किंगमध्ये झोपलेला आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ, पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि राजेंद्र शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अंधारात कार पार्किंग परिसरात आरोपी दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव रोहन दुर्गादास गवळी (वय ३३, व्यवसाय मजुरी, मूळ रा. मेसखेडा, ता. मंठा, जि. जालना, सध्या रा. शांतिनिकेतन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. अधिक चौकशीत त्याने अरुण जोगदंडे यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, उस्मानपुरा विभाग तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ, पोलीस अंमलदार मारोती गोरे आणि राजेंद्र शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.