डोळ्यांत मिरची पूड फेकून व्यापाऱ्याला लुटले! १.५५ लाखांची रोकड पळवणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गंगापूर तालुक्यातील धक्कादायक घटना; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, मोटारसायकलसह १ लाख ४१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

डोळ्यांत मिरची पूड फेकून व्यापाऱ्याला लुटले! १.५५ लाखांची रोकड पळवणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून त्याच्याकडील १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेत चोरीतील काही रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ४१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नेमकी घटना काय?

गंगापूर तालुक्यातील मुददेश वडगाव येथील व्यापारी शंकर कारभारी सोनवणे (वय ६५) हे १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बोलेरो जीपमधून जात होते. यावेळी विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून त्यांना लक्ष्य केले.

आरोपींपैकी एकाने सोनवणे यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली, तर अन्य दोघांनी त्यांच्या ट्राउझरच्या खिशातून बोलेरोची चावी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर जीपच्या पुढील सीटवर ठेवलेल्या बॅगेतील १ लाख ५५ हजार रुपयांची रोकड घेऊन तिघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपासातून आरोपींचा छडा

या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्यासह पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विकास भाऊसाहेब काकडे (वय २०, रा. भालगाव, ता. गंगापूर) हा संशयित असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यानंतर त्याने मोबाईल बंद करून गावातून पलायन केले होते. तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर अजीम रज्जाक शहा (वय १९, रा. भालगाव, ता. गंगापूर) याला भालगाव येथून, तर समाधान सुदाम ठोकळ (रा. धोंदलगाव, ता. वैजापूर) याला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आले.

मोटारसायकलसह मुद्देमाल जप्त

तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल अजीम शहा याच्या मालकीची असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून मोटारसायकल जप्त केली. तसेच चोरीच्या रकमेपैकी काही रोकडही हस्तगत केली. एकूण १ लाख ४१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, भागीनाथ आहेर, शिवानंद बनगे, अशोक वाघ, अनिल काळे तसेच तांत्रिक विभागाचे योगेश तरमाळे आणि जीवन घोलप यांनी ही कारवाई केली.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित