टेलीग्राम ‘टास्क’ आमिषातून कोट्यवधींची फसवणूक उघड; 5.71 लाखांची रक्कम जप्त, एक आरोपी ताब्यात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १९ :-
टेलीग्रामवर ‘टास्क’ देऊन गुंतवणुकीत दुप्पट नफा देण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आरोपी आचल नंदलाल शर्मा (रा. गोंदिया) याला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील 5,71,000 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
दि. 24 जानेवारी 2025 रोजी बिडकीन येथील तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदारास टेलीग्राम ग्रुपमध्ये सामील करून गुंतवणूक केल्यास दुप्पट नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला काही वेळा ‘दाम दुप्पट’ देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर सुमारे एक महिन्याच्या कालावधीत वेळोवेळी ‘टास्क’ देत गोंदिया, मेंगलोर व केरळ येथील विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. दुप्पट नफ्याच्या अपेक्षेने तक्रारदाराकडून एकूण 29,25,005 रुपये भरणा करून आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 03/2025 अन्वये कलम 318(4) भा.न्य.सं. व कलम 66(ड) आय.टी. अॅक्ट-2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात तक्रारदाराने भरलेली रक्कम ज्या खात्यांत जमा झाली त्याची तसेच आरोपीने वापरलेल्या मोबाईल क्रमांकांची माहिती संबंधित नोडल अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. त्यात तक्रारदाराची रक्कम आचल नंदलाल शर्मा याच्या एच.डी.एफ.सी. बँक खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले.
तपास पथकाने गोंदिया येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीच्या एच.डी.एफ.सी. बँक खात्यातील तक्रारदाराची 5,71,000 रुपये रक्कम गोठवून यशस्वीरीत्या रिकव्हर करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, निशा बनसोड, तसेच पोलीस अंमलदार कैलास कामठे, संतोष तांदळे, दत्ता तरटे, सविता जायभाये, मुकेश वाघ, राजेश राठोड, योगेश तरमळे व जीवन घोलप यांनी केली.
ऑनलाइन आमिषांपासून सावध रहा — संशयास्पद ‘टास्क’ आणि दुप्पट नफ्याच्या ऑफरपासून दूर राहणेच सुरक्षित!