दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई! ग्रामीणमध्ये दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे जप्त; दोन आरोपी अटकेत
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- ग्रामीण दहशतवाद विरोधी शाखेने अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा घाव घालत दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही धडाकेबाज कारवाई दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आली.
दहशतवाद विरोधी शाखेचे पथक गस्तीवर असताना सपोनि दिनकर शिवाजीराव गोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, छत्रपती संभाजीनगर–जालना रोडवरून मोटारसायकलवरून अवैधरित्या गावठी कट्टा विक्रीसाठी नेला जात आहे.
या खात्रीलायक माहितीनुसार पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिरापूर शिवार परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित मोटारसायकलस्वाराला थांबवून झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले. चौकशीत त्याने आपले नाव बाबासाहेब रामराव ऊर्फ रामभाऊ मिसाळ (वय ३०, रा. जानेफळ दाभाडी, ता. भोकरदन, जि. जालना) असल्याचे सांगितले.
अधिक तपासात आरोपीने आणखी एक कट्टा व दोन जिवंत काडतुसे छत्रपती संभाजीनगर येथील रईस खॉन याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने तात्काळ झाल्टा फाटा येथे कारवाई करत रईस खॉन अजिम खान पठाण (रा. हुसेन कॉलनी, पुंडलिकनगर, छ. संभाजीनगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे चिकलठाणा येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३, २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चिकलठाणा पोलीस करत आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि दिनकर गोरे, पोउपनि मनोहर खंडागळे, तसेच पोलीस अंमलदार विक्रम देशमुख, श्रीमंत भालेराव, संजय घुगे, राजेंद्र डकले, वाल्मिक निकम व गणेश कोरडे यांनी सहभाग घेतला.
अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसांचा कडवा वार; शहर व ग्रामीण भागात खळबळ!