घरफोडी टोळीचा पर्दाफाश! स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ५ घरफोडी उघड, सराईत आरोपी जेरबंद
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत दोन मुख्य आरोपींना अटक करून चोरीचा सुमारे ६०,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २६/११/२०२५ रोजी फुलंब्री येथील हरिओम नगर परिसरात घरफोडी झाल्याप्रकरणी फिर्यादी मज्जीब मन्नान शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन फुलंब्री येथे गु.र.नं. ५५०/२०२५ अन्वये भा.न्या.संहिता २०२३ मधील कलम ३०५ (अ), ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक सक्रिय झाले.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे मंगेश भुग्रा भोसले (वय ५०) व दिनेश सखाराम काळे (वय ४५), रा. रहाटगाव ता. पैठण या सराईत आरोपींना गेवराई येथून सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्यांनी साथीदारांच्या मदतीने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून फुलंब्री, शिवूर, गंगापूर व पैठण पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या एकूण ५ घरफोडीच्या गुन्ह्यांतील
🔹 २५,००० रुपये रोख
🔹 ३५,५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने
असा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन फुलंब्री येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने करीत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आहे.
👉 कायद्याच्या भीतीने नव्हे, तर कारवाईच्या खात्रीने गुन्हेगार हादरले!