टायर पंक्चरच्या दुकानातून डॉक्टरकीच्या स्वप्नापर्यंत! साहिलची NEETमध्ये घवघवीत भरारी; MBBSसाठी निवड
महाराष्ट्र वाणी
राहाता (प्रतिनिधी) दि ७ :- प्रतिकूल आर्थिक परिस्थिती ही यशाच्या मार्गातील अडथळा नसून जिद्द आणि मेहनतीसमोर तीही हरते, याचे प्रेरणादायी उदाहरण राहाता येथील साहिल शकील भाई इनामदार याने घालून दिले आहे. टायर पंक्चरचे दुकान चालविणाऱ्या कुटुंबातील साहिलने 'नीट' परीक्षेत ५३० गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्याची नाशिक येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
साहिलच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबासह राहाता शहरात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राबियानगर परिसरातील शाही मशिदीत मुस्लिम बांधवांच्या वतीने त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाला नगरसेवक हाजी मुन्नाभाई शाह, नगरसेवक शफिक रफिक शाह यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी साहिलच्या जिद्दीचे आणि कठोर परिश्रमाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साहिलने अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत शिक्षण घेतले. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता त्याने सातत्याने अभ्यास, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने मोठी झेप घेतली.
सत्काराला उत्तर देताना साहिलने सांगितले की, आई-वडिलांनी आपल्या मुलासाठी घेतलेल्या कष्टाचे चीज करणे आणि त्यांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणे हेच त्याच्या यशामागील सर्वात मोठे प्रेरणास्थान आहे.
महाराष्ट्रातील नीट परीक्षार्थींमध्ये सुमारे चार हजारांच्या आसपास क्रमांक मिळवत साहिलने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. आता एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करून एक यशस्वी डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न आहे.
बिकट परिस्थितीला दोष देण्याऐवजी ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असा संदेश साहिलच्या प्रवासातून मिळतो. समाजातील इतर होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत त्याचा विशेष सन्मान केला.
टायर पंक्चरचे दुकान चालविणाऱ्या वडिलांचा मुलगा आज डॉक्टरकीच्या दिशेने टाकत असलेले हे पाऊल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.