छत्रपती संभाजीनगर मनपाची मालमत्ता कर वसुली १०० कोटींच्या पार; ‘शास्तीमुक्त’ अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद!
अवघ्या १९ दिवसांत ४,३७८ मालमत्ताधारकांकडून ७.४३ कोटींचा भरणा; थकीत करावरील शास्तीतून मुक्त होण्याची नागरिकांना संधी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमेला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीने १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. १ एप्रिल ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मनपाच्या तिजोरीत तब्बल १०० कोटी ६० लाख २३ हजार ७४९ रुपये जमा झाले आहेत. विशेष म्हणजे, थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर’ अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ९६ हजार ६४१ मालमत्ता कर भरणा पावत्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसुलीने १०० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
दरम्यान, ६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झालेल्या ‘शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर’ या विशेष अभियानांतर्गत अवघ्या १९ दिवसांत ४ हजार ३७८ मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरला आहे. या माध्यमातून महानगरपालिकेला ७ कोटी ४२ लाख ७६ हजार ४८६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
थकीत मालमत्ता कर भरण्यास नागरिकांना प्रोत्साहन देणे, महानगरपालिकेचा महसूल वाढविणे आणि शहराच्या विकासकामांसाठी आर्थिक स्रोत उपलब्ध करून देणे, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत थकीत कराचा भरणा करावा, यासाठी कर वसुली विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी महापौर समीर राजूरकर यांनी शहरातील नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, मालमत्ता कराच्या ओझ्यातून मुक्त होण्याची सुवर्णसंधी शहरातील सर्व नागरिकांना उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ घेऊन ‘शास्तीमुक्त छत्रपती संभाजीनगर’ बनविण्यास सर्वांनी हातभार लावावा.
तर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनीही सर्व मालमत्ताधारकांनी अभियानाचा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर भरावा आणि शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
एकीकडे मालमत्ता कर वसुलीने १०० कोटींचा टप्पा पार केला असताना, दुसरीकडे शास्तीमुक्त अभियानातूनही मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत आहे. आता उर्वरित थकबाकीदार नागरिक या संधीचा कितपत लाभ घेतात, याकडे महानगरपालिकेचे लक्ष लागले आहे.