छत्रपती संभाजीनगरात ‘हायड्रो गांजा’ विक्रीचा पर्दाफाश; गुन्हे शाखेची धडक कारवाई, 29.51 लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री करणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तब्बल 29 लाख 51 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बाबा पेट्रोल पंप परिसर, लोखंडी पुलाजवळ येथे करण्यात आली.
याबाबत क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 45/2026 दाखल करण्यात आला असून एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 20 (ब), (ii) (अ), 29 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात अभिजीत द्वारकादास चिखलीकर यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हे शाखेला 10 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10.20 वाजता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बाबा पेट्रोल पंप परिसरात दोन इसम मोटरसायकलवरून गांजा विक्रीसाठी येणार आहेत. या खात्रीलायक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान आरोपी क्रमांक 1 च्या बॅगमध्ये 285 ग्रॅम वजनाचा विदेशी ‘हायड्रो’ गांजा आढळून आला. बाजारभावानुसार या गांजाची प्रति ग्रॅम किंमत सुमारे 10 हजार रुपये असल्याचे समोर आले. पोलिसांनी हा गांजा, डिजिटल वजन काटा, दोन मोबाईल फोन आणि एक मोटारसायकल असा एकूण 29,51,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
1) राजवीर चरणसिंग विरग (वय 20, रा. एन-4, हनुमान मंदिराजवळ)
2) ओम रविंद्र शिंदे (वय 23, रा. शहीद भगतसिंग कॉलनी, एन-4)
अशी असून या प्रकरणात इतर 6 ते 7 साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, हा हायब्रीड ‘हायड्रो’ गांजा दुर्मिळ असून त्याची मोठी मागणी आहे, त्यामुळे ते सर्व मिळून प्रति ग्रॅम 10 हजार रुपये दराने विक्री करत होते. या टोळीतील इतर आरोपींचा शोध सध्या गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने केली. या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे, प्रविण वाघ, अभिजीत चिखलीकर तसेच इतर पोलिस कर्मचारी सहभागी होते.
शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली असून कोठेही अवैधरित्या गुंगीकारक औषधांची विक्री होत असल्यास नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशन, डायल 112 किंवा 9226514001 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
— “नशेच्या जाळ्यावर पोलिसांची कारवाई सुरूच; शहरात अंमली पदार्थ विक्रेत्यांवर आता पोलिसांचा कडक नजर!”