घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासाठी हजाराची लाच मागितली; ग्रामीण गृहनिर्माण अभियंता ACB च्या जाळ्यात
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २९ :- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता काढून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (२९ जून) वैजापूर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गायकवाड (वय ३५), ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती ढवळा खंबाळा, ता. वैजापूर यांनी तक्रारदाराकडे घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याचा ७५ हजार रुपयांचा चेक काढून देण्यासाठी आणि जिओ टॅगिंग व फोटो अपलोड प्रक्रियेसाठी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. २५ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने एक हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सोमवारी वैजापूर पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला.
कारवाईदरम्यान आरोपीने तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB पथकाने त्याला ताब्यात घेतले. आरोपीच्या अंगझडतीत दोन मोबाईल, एक हजार रुपयांची लाच रक्कम आणि इतर ४५० रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त साहित्याचे पुढील विश्लेषण सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक प्रतिभा अबूज यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — तुमच्या परिसरातील प्रत्येक घडामोडी सर्वात आधी!