ग्रामीण पोलिसांचा दणका! सराईत घरफोड्या जेरबंद; ४ गुन्ह्यांची उकल, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १५ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत सराईत आरोपीला जेरबंद केले आहे. भगवान ईश्वर भोसले (वय २४, रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर; सध्या रा. नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चार घरफोड्यांमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि एक होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण २ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वडोदबाजार आणि अजिंठा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चार घरफोड्यांची उकल झाली आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास
६ ऑगस्ट २०२६ रोजी फुलंब्री तालुक्यातील कोलते टाकळी येथील दीपक रावसाहेब कोलते यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. याप्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत यांच्या पथकाकडून सुरू होता. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील हॉटेल्स, घटनास्थळ परिसर आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू ठेवला.
तपासादरम्यान भगवान भोसले याने हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तांत्रिक विश्लेषणातून खात्री करून पथकाने त्याचा शोध सुरू ठेवला.
मुरमा फाट्यावर सापळा; आरोपी ताब्यात
आरोपी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगरकडे येणार असल्याची माहिती १३ ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुरमा फाटा येथे सापळा रचला. संशयित आरोपीची ओळख पटवून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या मागील सहा महिन्यांतील वास्तव्याच्या ठिकाणांची आणि येण्या-जाण्याच्या मार्गांची माहिती तपासली असता, कोलते टाकळी, पाथ्री, उंडणगाव आणि शिवनावाडी परिसरात घरफोड्या केल्याचे त्याने सांगितले.
वडोदबाजारचे दोन, अजिंठ्याचे दोन गुन्हे उघड
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने केलेल्या चौकशीतून वडोदबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि अजिंठा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन असे एकूण चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यांमधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच होंडा युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण २,००,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी वडोदबाजार पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, पुढील तपास तेथील पोलीस अधिकारी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक प्रकाश भा. जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, दत्ता मुंडे, गोपाल पाटील, संतोष डोंगरे, बलविरसिंग बहुरे, सनी खरात, योगेश तरमळे, जीवन घोलप आणि शिवाजी मगर यांनी ही कारवाई केली.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित