गोदावरीतून वाळूचोरीचा डाव उधळला! पाचोड पोलिसांची धडक कारवाई; ₹१०.१० लाखांचा हायवा व वाळू जप्त

गोदावरीतून वाळूचोरीचा डाव उधळला! पाचोड पोलिसांची धडक कारवाई; ₹१०.१० लाखांचा हायवा व वाळू जप्त

महाराष्ट्र वाणी

पाचोड दि ६ :- अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पाचोड पोलिसांनी धडक कारवाई करत विनाक्रमांक टाटा मिनी हायवासह दोन ब्रास वाळू असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे पाचोड हद्दीतील पारुंडी शिवारातील गट क्रमांक ७३ येथे रविवारी (दि. ६ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गंगाराम कुऱ्हाडे, सोहेल अन्वर शेख आणि गौरव विनोद डुकळे हे आरोपी, गणेश भागाजी डुकळे यांच्या मालकीच्या विनाक्रमांक पिवळ्या रंगाच्या टाटा मिनी हायवामधून वाळूची वाहतूक करीत होते. ही वाहतूक आरोपी संदीप छबुराव डुकळे याच्या सांगण्यावरून करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

हिरडपुरी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून कोणताही वैध परवाना अथवा रॉयल्टी न भरता अंदाजे दोन ब्रास वाळूचे उत्खनन करून तिची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी कारवाई करत अंदाजे १० लाख रुपये किमतीचा विनाक्रमांक टाटा मिनी हायवा आणि १० हजार रुपये किमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुरनं. ३७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९, ३(५) तसेच केंद्रीय मोटार वाहन कायदा कलम ५० अन्वये पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पाचोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनिसो पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका ७८२ साबळे, पोलीस अंमलदार १६९१ सानप व आयनले यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार साबळे करीत आहेत