“गावोगावी रंगत आणणारे बहुरूपी हरवत चालले; नव्या पिढीला फक्त आठवणींचाच आधार”

“गावोगावी रंगत आणणारे बहुरूपी हरवत चालले; नव्या पिढीला फक्त आठवणींचाच आधार”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ :- एकेकाळी ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जाणारे बहुरूपी आता गावागावांतून जवळपास गायब होत चालल्याचे चित्र दिसत आहे. पूर्वी पोलिसांचा पोशाख, डोक्यावर टोपी, कंबरेला बनावट बंदूक अशा वेगवेगळ्या वेशभूषेत हे कलाकार खेडोपाडी, आठवडी बाजारात आणि गल्लीबोळांत फिरताना सहज दिसत असत. त्यांच्या अनोख्या अभिनयामुळे गावातील वातावरण रंगतदार होत असे.

बहुरूपी गावात आले की लहान मुले त्यांना पाहून घाबरत घरात पळून जात, तर मोठी माणसे त्यांच्या संवादांवर आणि अभिनयावर मनमुराद हसत असत. विविध व्यक्तिरेखा साकारत हे कलाकार गमतीदार संवाद, विनोदी शैली आणि हावभावांच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत असत.

ग्रामीण भागातील लोकांकडून मिळणारे पाच-दहा रुपये किंवा धान्य यावरच अनेक बहुरूपी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत असे. लोककलेचा वारसा जपत त्यांनी अनेक वर्षे गावोगावी आनंद पसरवला. मात्र बदलत्या काळात आधुनिक मनोरंजनाच्या साधनांनी जागा घेतल्याने ही कला मागे पडताना दिसत आहे.

आजच्या डिजिटल युगात बहुरूपी क्वचितच पाहायला मिळतात. त्यामुळे नव्या पिढीला ही लोककला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधीही मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. ग्रामीण संस्कृतीची ओळख जपणारी ही कला आता केवळ आठवणींपुरती मर्यादित राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

“लोककलेचा वारसा जपला नाही, तर उद्या बहुरूपी फक्त इतिहासाच्या पानांतच दिसतील...”